झटपट ऑनलाईन कर्ज घेणाऱ्यांची पिळवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:48+5:302021-01-04T04:18:48+5:30
अहमदनगर: ‘झटपट ऑनलाईन कर्ज मिळाले पण डोक्याला मोठा ताप झालाय’ असा पश्चाताप करण्याची सध्या अनेकांवर वेळ आली आहे. त्याचे ...

झटपट ऑनलाईन कर्ज घेणाऱ्यांची पिळवणूक
अहमदनगर: ‘झटपट ऑनलाईन कर्ज मिळाले पण डोक्याला मोठा ताप झालाय’ असा पश्चाताप करण्याची सध्या अनेकांवर वेळ आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. कर्ज देणाऱ्यांकडून वसुलीसाठी कर्जदाराला तसेच त्याच्या नातेवाईकांना रात्रंदिवस फोन अन् मेसेज करून या ऑनलाईन सावकारांनी बेजार केले आहे. विशेष म्हणजे हे वसुली पंटर शिवीगाळ आणि धमक्याही देत असल्याने अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.
झटपट आणि सुलभरित्या कर्ज देणाऱ्या ऑनलाईन ॲप्लिकेशनचे सध्या पेव फुटले आहे. अवघ्या पाच मिनिटात मिळेल कर्ज अशी जाहिरातबाजी केली जात आहे. केवळ आधारकार्ड क्रमांक देऊन पाच ते सात हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. नगर शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी तरुण व व्यावसायिकांनी हे ऑनलाईन कर्ज घेतले आहे. कर्ज घेण्यासाठी ॲप्लिकेशन डाऊनलोड करताना मोबाईलमधला सर्व डाटा ॲप्लिकेशनचालकांकडे जातो. कर्जपरतफेडीची मुदत अवघी पाच ते दहा दिवसांची असते आणि त्याला व्याज २५ ते ४० टक्क्यांपर्यंत असते. मुदतीत पैसे दिले नाही तर कर्जदारासह त्याच्या मोबाईलमधील संपर्क यादीतील लोकांना रात्री-अपरात्री फोन केले जातात, मेसेज पाठविले जातात. अशा फोन कॉल्समुळे बहुतांशी जण गोंधळून जातात. या फोनची कटकट नको म्हणून बहुतांशी जण ३० ते ४० टक्के व्याज भरून पैसे देत आहेत तर काही जण पोलिसांकडे तक्रार करत आहेत.
...........................
असे ॲप्लिकेशन्स घातक
झटपट कर्ज देणारे ॲप्लिकेशन्स डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलमधील सर्व डाटा हॅक होत असल्याने
मोबाईलधारकाची सर्व माहिती समोरील व्यक्तीकडे जाते. या माध्यमातून ब्लॅकमेलिंग व इतर आर्थिक फसवणुकीचेही प्रकार घडले आहेत.
.....................
संपर्कातील लोक गोंधळतात
कर्जाच्या वसुलीसाठी सदर कंपनीच्या कॉलसेंटरकडून कर्जदाराच्या संपर्कातील व्यक्तींना फाेन गेल्यानंतर ते गोंधळून जातात. त्याने पैसे दिले नाही तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील, अशी धमकी दिली जाते. ज्यांना धमकी मिळते ते लोक पुन्हा या कर्ज घेणाऱ्याला संपर्क करून विचारणा करतात. हा प्रकार थेट सायबर गुन्ह्याचा नसल्याने तक्रार केल्यानंतर याबाबत पोलीस स्टेशनमध्ये अदलपात्र गुन्ह्याची नोंद होते. गेल्या एक ते दीड महिन्यांत यासंदर्भात बारा लोकांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पाठविण्यात आले.
.........................
पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी बहुतांशी जण सध्या असे ऑनलाईन कर्ज घेत आहेत. मात्र घेतलेल्या पैशाच्या बदल्यात भरमसाठ रकमेची मागणी करून कर्जदाराला धमक्या देण्याचे प्रकार घडत आहेत. कर्जदार स्वत: कर्ज घेत असल्याने हा प्रकार सायबर ॲक्टमध्ये येत नाही मात्र नागरिकांनी अशा आमिषाला बळी पडू नये. यामध्ये मोबाईल डाटा हॅक होत असल्याने आणखी फसवणुकीचे प्रकार घडू शकतात.
-प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस स्टेशन