टंचाईच्या योजनांना महिनाभराची मुदतवाढ
By Admin | Updated: July 5, 2014 00:29 IST2014-07-04T23:14:13+5:302014-07-05T00:29:14+5:30
अहमदनगर: पाऊस लांबल्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली असून, टंचाईच्या विविध योजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात
टंचाईच्या योजनांना महिनाभराची मुदतवाढ
अहमदनगर: पाऊस लांबल्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली असून, टंचाईच्या विविध योजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिली़
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक झाली़ बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ त्यावेळी ते बोलत होते़ राज्यात कालपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे़ मात्र जून पूर्णपणे कोरडा गेल्याने जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली़ मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडला़ त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत़ वास्तविक पाहता टंचाईच्या विविध योजना ३० जूनपर्यंतच कार्यान्वित असतात़ परंतु पाऊस न पडल्याने टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, टंचाईबाबतच्या इतर योजनांनाही मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मुदतवाढ देण्याच्या निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले़
राज्यातील सर्व धरणातील पाणी पातळी खालावली आहे़ त्यामुळे पाणी वाटपाचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत़ त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठी पाणी द्यायचे आहे़ टँकरची मागणी केल्यास तातडीने टँकर उपलब्ध करून दिले जातील़
टँकरचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले असून, पिण्याच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल़
नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे़ वेळप्रसंगी मजुरांना काम उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आल्यास ते घेतले जातील, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली़
(प्रतिनिधी)
राहुरी विद्यापीठात कडवळ
पाऊस न पडल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे़ चाऱ्याची गरज लक्षात घेऊन राहुरी कृषी विद्यापीठात कडवळाची पेरणी करण्यात येणार असून, आवश्यक त्याठिकाणी ते पुरविले जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले़
पाणी कपातीच्या सूचना
जिल्ह्यातील पाणी पातळी खालावली आहे़ त्यामुळे मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात जुलै अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे़ उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे़ खबरदारीच्या उपाय योजना म्हणून पाणी कपात करण्याची आवश्यकता आहे़ इतर जिल्ह्यात पाणी कपातीचे निर्णय घेण्यात आले असून, नगर जिल्ह्यात १० ते २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याच्या सूचना पवार यांनी यावेळी दिल्या़
थकीत पाणी योजनांना संजीवनी
जिल्ह्यातील पाणी योजनांची वीज बिले थकलेली असल्याने पाणी योजना बंद आहेत़ प्रादेशिक पाणी योजनांची थकबाकी वसूल न करता चालू बिले वसूल करून पाणी योजना सुरू ठेवल्या जातील़ चालू बिले वसूल करून योजना सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ महावितरणालादेखील तसे आदेश निर्गमित केल्याचे त्यांनी सांगितले़
डायरेक्ट कॉल करा़़़़
एकमेकांना सहकार्य करा, टंचाईवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा, व्यवस्थित नियोजन करा, गरज भासल्यास पालकमंत्र्यांशी चर्चा करा आणि तिथे प्रश्न सुटले नाही तर थेट आमच्याशी संपर्क साधला तरी चालेल, असेही पवार म्हणाले़