विस्तार अधिकाऱ्याची कर्जतमध्ये आत्महत्या
By Admin | Updated: July 4, 2014 01:21 IST2014-07-04T01:14:39+5:302014-07-04T01:21:25+5:30
कर्जत (जि.अहमदनगर): जामखेड पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी परशुराम ज्ञानदेव मचे (वय ४२) यांनी कर्जत येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी (दि़३) सकाळी उघडकीस आला़

विस्तार अधिकाऱ्याची कर्जतमध्ये आत्महत्या
कर्जत (जि.अहमदनगर): जामखेड पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी परशुराम ज्ञानदेव मचे (वय ४२) यांनी कर्जत येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी (दि़३) सकाळी उघडकीस आला़
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मचे हे जामखेड पंचायत समितीत विस्तार अधिकारी पदावर कार्यरत होते़ ते मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील रहिवासी असून सध्या ते कर्जत येथील बुवानगर येथे राहत होते़
काही दिवसांपूर्वी मचे त्यांच्या दुचाकीवरुन पडून जखमी झाले होते़ त्यामुळे मचे यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता़ ३० जूनपासून मचे हे घरीच विश्रांती घेत होते़ मचे यांची पत्नी मुलांसह एका नातेवाईकाच्या लग्नाला गेलेली होती़ त्यामुळे मचे बुधवारी (दि़२) एकटेच घरी होते़
गुरुवारी सकाळी त्यांची पत्नी लग्नाहून परतल्यानंतर अनेकदा आवाज देऊन दरवाजा उघडला नाही़ त्यामुळे तिने शेजारी राहणाऱ्यांना आवाज दिला़ अनेकांनी आवाज देऊनही दरवाजा उघडला नाही़ म्हणून मचे यांचे शेजारी दत्तात्रय पांडुरंग मेंगडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरुन कळविले़ त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ घराचा दरवाजा उघडला त्यावेळी मचे हे मृतावस्थेत आढळून आले़ त्यांच्यावर घोडेगाव (ता़ श्रीगोंदा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी या घटनेची नोंद केली नव्हती़ (तालुका प्रतिनिधी)