काळे वगळता इतर पक्षांचे आयात उमेदवार
By Admin | Updated: September 27, 2014 23:07 IST2014-09-27T22:57:45+5:302014-09-27T23:07:24+5:30
कोपरगाव : गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे आमदार असलेल्या अशोक काळे यांचे चिरंजीव आशुतोष काळे वगळता इतर राजकीय पक्षांनी इतर पक्षांतून आयात झालेल्यांना उमेदवारी दिली आहे़

काळे वगळता इतर पक्षांचे आयात उमेदवार
कोपरगाव : गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे आमदार असलेल्या अशोक काळे यांचे चिरंजीव आशुतोष काळे वगळता इतर राजकीय पक्षांनी इतर पक्षांतून आयात झालेल्यांना उमेदवारी दिली आहे़
कोल्हे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस असा समज कोपरगावमध्ये होता़ परंतु कोल्हे यांनी भाजपातर्फे उमेदवारी घेऊन अर्ज दाखल केला़ भाजपाचे कट्टर समर्थक विजय वहाडणे यांनी त्यामुळे अपक्ष अर्ज दाखल केला आहे़ वहाडणे यांची नाराजी काढण्याचे आव्हान कोल्हे यांच्यासमोर राहणार आहे़
नितीन औताडे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते़ काल-परवा पर्यंत ते मी कोल्हे गट सोडला आहे, राष्ट्रवादी नाही, असे सांगत होते़ मात्र काँग्रेसने त्यांना उमेदवारी देऊ केल्याने ते कॉँग्रेसवासी झाले.
काँग्रेसचा पारंपरिक मतदार त्यांना भेटणार असल्याने त्यांचे गणित बेरजेचे झाले आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसची दयनीय अवस्था कोपरगाव मतदारसंघात पहावयास मिळाली़ प्रथम माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना विचारणा झाली, त्यांनी नकार दिला़ त्यानंतर पक्षाचे प्रदेश सचिव संदीप वर्पे यांच्या नावाचीही चर्चा झाली़ राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा सरचिटणीस दीपक साळुंके यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती, परंतु ऐनवेळी वीर धनुर्धारी एकलव्य आदिवासी संघटनेचे अशोक गायकवाड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली.
(प्रतिनिधी)