कृषिमंत्र्यांच्या ताफ्याचे साईदर्शन अधिकाऱ्यांच्या खर्चातून

By Admin | Updated: July 11, 2016 23:48 IST2016-07-11T23:42:23+5:302016-07-11T23:48:01+5:30

शिर्डी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सोमवारी साईदरबारी हजेरी लावली़

The expenditure on agriculture minister's expenditure by the officials | कृषिमंत्र्यांच्या ताफ्याचे साईदर्शन अधिकाऱ्यांच्या खर्चातून

कृषिमंत्र्यांच्या ताफ्याचे साईदर्शन अधिकाऱ्यांच्या खर्चातून

शिर्डी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सोमवारी साईदरबारी हजेरी लावली़ केंद्रीय मंत्र्यांना व्हीआयपी दर्शन विनामूल्य असले तरी त्यांच्याबरोबर असलेल्या ताफ्याचे पासेस कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढल्याचे सकृतदर्शनी समोर आले़
सोमवारी दुपारी राधामोहनसिंह येथील शासकीय विश्रामगृहावर आले़ यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, सचिन शिंदे, शिवसेनेचे सचिन कोते, डॉ़ गाडेकर आदींची उपस्थिती होती़ कृषिमंत्र्यांनी साईदरबारी हजेरी लावली़ यावेळी त्यांच्याबरोबर दोन डझनाहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते़ केंद्रीय मंत्र्यांना संस्थानमध्ये व्हीआयपी पासेस विनाशुल्क दिले जातात़ मात्र, त्यांच्यासोबतच्या व्यक्तींना पासेस काढावे लागतात. राधामोहन सिंह यांच्यासोबतच्या ताफ्यासाठी ही व्यवस्था कृषी विभागाने केल्याचे दिसत आहे. दौऱ्यासाठी पासेस मिळावेत, असे अधिकृत पत्रच कृषी विभागाने संस्थानच्या जनसंपर्क विभागाला दिले होते़ या पत्राच्या आधारे या विभागातील गायकवाड व गावीत या दोन व्यक्तींनी प्रत्येकी पंधरा पासेस काढले़ दर्शनाच्या प्रत्येक पासची किंमत दोनशे रुपये आहे़
शिर्डीला कोणतेही मोठे शासकीय कार्यालय नसतांना येथे मंत्री,अधिकारी मोठ्या संख्येने भेट देत असतात़ या सर्वांचे बऱ्याचदा शासकीय खर्चाने व्हीआयपी दर्शन सुरू असते़ अनेकदा संबधित विभागांचे जिल्ह्णातील अधिकारी यासाठीची व्यवस्था करतात. सोमवारीही कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पासेससाठी सहा हजार रूपये खर्च केले़ हा खर्च कुणी व का केला, याबाबत या विभागाचे अधिकारी समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत.
मंत्र्यांच्या दर्शनानंतर तालुका कृषी अधिकारी दादासाहेब गायकवाड यांच्याशी संपर्क करून मंत्री महोदयांबरोबर असलेल्या लोकांचे पासेस कुणी काढले, अशी विचारणा केली असता त्यांनी पत्र दिल्याचे मान्य केले पण त्यासाठी पैसे कुणी दिले हे माहिती नसल्याचे सांगत विभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे यांच्याकडे निर्देश केला़ त्यांच्याकडे चौकशी केली असता आमचा या पासेसशी काहीही संबंध नसून ही व्यवस्था संस्थानने केल्याचे त्यांनी सांगितले़ प्रत्यक्षात खात्री केली असता हे पासेस कृषी विभागाच्या गायकवाड व गावीत यांच्या नावाने काढण्यात आलेले आहेत़ या विभागाने हा खर्च कसा केला, यासाठी कुणी पैसे दिले आदी प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत़ शासकीय कार्यालय दर्शनासाठी पत्र देऊ शकते का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दर्शनापूर्वी शासकीय विश्रामगृहावर कृषिमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. मात्र, पत्रकारांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The expenditure on agriculture minister's expenditure by the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.