आषाढी एकादशी ठिकठिकाणी उत्साहात
By Admin | Updated: July 10, 2014 00:35 IST2014-07-09T23:42:04+5:302014-07-10T00:35:42+5:30
अहमदनगर- ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून - आषाढी एकादशी जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आषाढी एकादशी ठिकठिकाणी उत्साहात
अहमदनगर- ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून - आषाढी एकादशी जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘ज्ञानोबा तुकारामा’चा गजर करीत बालवारकऱ्यांनी दिंड्या काढल्या होत्या. या दिंड्या नागरिकांचे आकर्षण ठरले.
‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी गर्दी
नेवासा : संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरातील ‘पैस’ खांबाचे बुधवारी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शन घेतले. पहाटे साडेचार वाजता संत ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष अॅड. माधवराव दरंदले यांच्या हस्ते ‘पैस’ खांबासह मंदिरातील विठ्ठल-रुख्मिणी मूर्तीला अभिषेक केला. पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली होती. नेवाशालगत असलेल्या विठ्ठल, रुख्मिणी मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, श्री मोहिनीराज ही मंदिरेही गर्दीने फुलून गेली होती. नेवासा येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलच्यावतीने शाळा ते संत ज्ञानेश्वर मंदिर अशी एक कि.मी. अंतरापर्यंत दिंडी काढण्यात आली. या बाल वारकऱ्यांनी मंदिर प्रांगणात रिंगण सादर केले. बालवारकऱ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, विठ्ठल-रुख्मिणी यांची वेषभूषा केली होती. ‘ज्ञानोबा, तुकारामा’च्या गजराने परिसर दुमदुमुन गेला होता.
जवळेत भाविकांची मांदियाळी
जवळे : पारनेर
तालुक्यातील जवळे येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात पहाटेपासूनचभाविकांनी गर्दी केली होती. एरेअर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बालदिंडी काढली होती. ही दिंडी जवळेकरांचे आकर्षण ठरली. प्राचार्य सोनाली सालके, ‘संस्थेचे अध्यक्ष संदीप सालके यांनी
याकामी विशेष परिश्रम घेतले.
मिरीत प्रभातफेरी
पाथर्डी : तालुक्यातील मिरी येथे सकाळी सीताराम सत्संग परिवाराच्यावतीने प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. पसायदानमध्ये रामायणाचार्य डॉ. वेणूनाथ महाराज वेताळ यांचे प्रवचन झाले. भागिरथीबाई विठ्ठल मंदिरात अभिषेक करण्यात आला. यंदा भरपूर पाऊस पडून सर्वत्र सुख, समृध्दी नांदू दे, अशी भाविकांंंनी प्रार्थना केली.
पिंपळनेर, पळशी येथे लाखो भाविकांची हजेरी
पारनेर : आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील प्रति पंढरपूर समजले जाणारे पिंपळनेर येथील संत निळोबारायांचे समाधी मंदिर, पळशी येथील विठ्ठल मंदिर व पारनेर येथील विठ्ठल मंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेऊन विठुनामाचा गजर केला. त्यामुळे परिसर दुमुदुमुन गेला होता. श्री क्षेत्र पिंपळनेर येथे करंदीसह शेजारचा तालुका व जिल्ह्यातून दिंड्यांचे आगमन झाले. निळोबारायांची समाधी व विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी वारकऱ्यांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. पारनेर येथील विनायक विद्या मंदिरातील चिमुकल्यांनी पारनेरमधून दिंडी काढली. दिंडीचे मुख्याध्यापक प्रवीण साळवे, जयश्री कोरडे, शोभना बांदल, सविता औटी यांनी नियोजन केले.
वृध्देश्वर गर्दीने फुलले
करंजी : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. वृध्देश्वर देवस्थान व भाविकांच्यावतीने खिचडीचे वाटप करण्यात आले. करंजी येथे उत्तरेश्वर मंदिर, उत्तरेश्वर सिध्देश्वर, कमलेश्वर, सावळेश्वर येथेही भााविकांची गर्दी लोटली होती.
वरुर बुद्रूक भक्तिमय
शेवगाव : धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील वरुर बुद्रुक येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसर आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय झाला होता. अनेक गावांमधील दिंड्या येथे दाखल झाल्या होत्या. सकाळी प्रभातफेरीनंतर त्रिवेणी संगमावरुन कावडीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मूर्तीला अभिषेक करण्यात आला. पांडुरंग कृषी विज्ञान मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शेवगाव पंचायत समितीच्यावतीने भाविकांच्या प्रबोधनासाठी लावण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन सभापती अरुण लांडे यांच्या हस्ते झाले. सायंकाळी हभप दिनकर महाराज अंचवले यांचे कीर्तन झाले.
सोनईत दिंडी
सोनई : येथील मुळा पब्लिक स्कूल व यश अकॅडमी सी.बी. एस.ई. या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली होती. दिंडीत पहिली ते दहावीपर्यंतचे नऊशे विद्यार्थी सहभागी झाले होते. रक्तदान, नेत्रदान, स्त्री भ्रूणहत्या, ‘पाणी वाचवा, झाडे लावा‘ आदी समाज जागृतीचे संदेश विद्यार्थ्यांनी फलकाच्या माध्यमातून दिले.