माजी मंत्री धस यांची तहसीलदारांना शिवीगाळ

By Admin | Updated: July 1, 2016 00:31 IST2016-07-01T00:15:31+5:302016-07-01T00:31:54+5:30

जामखेड : माजी मंत्री सुरेश धस यांनी गुरूवारी सकाळी जामखेडचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांना नगर पालिकेच्या निविदेसंदर्भात शिवीगाळ केली

Ex-minister Dhas's tahsildar | माजी मंत्री धस यांची तहसीलदारांना शिवीगाळ

माजी मंत्री धस यांची तहसीलदारांना शिवीगाळ


जामखेड : माजी मंत्री सुरेश धस यांनी गुरूवारी सकाळी जामखेडचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांना नगर पालिकेच्या निविदेसंदर्भात शिवीगाळ केली. या घटनेचा निषेध करीत महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारपासून काम बंद केले. आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.
जामखेड पालिकेने विंचरण नदीचे खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण या कामाच्या तीन स्वतंत्र निविदा भरण्याची गुरूवारी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत दिली होती. पालिकेत १० वाजेपर्यंत तीन निविदा आल्या होत्या.
साडे अकराच्या सुमारास दोन ठेकेदार निविदा भरण्यासाठी आले असता आवक जावक नोंद करणारा कमर्चारी तेथे नव्हता.
निविदा घेण्यासाठी कर्मचारी नसल्याने ठेकेदाराने पालिकेतील विरोधी गटनेते महेश निमोणकर व नगरसेवक बिभीषण धनवडे यांना मोबाईलवरून माहिती देताच ते पालिकेत हजर झाले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना निविदा घेण्यास सांगितले. मात्र निविदा घेण्यास ते तयार होईनात.
निमोणकर व धनवडे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यासाठी तहसीलमध्ये गेले. निवेदन घेऊन तहसीलदार बेल्हेकरांनी पालिका कर्मचाऱ्यास विचारणा केली. त्यानंतर कर्मचाऱ्याने निविदांचे पाकीट घेतले.
घटनेची माहिती पालिका पदाधिकारी व नगरसेवकांकडून माजी मंत्री सुरेश धस यांना मिळताच त्यांनी तहसीलदारांशी मोबाईलवर संपर्क करून पालिकेच्या कामात हस्तक्षेप का केला?, असा जाब विचारीत शिवीगाळ केली. हा प्रकार तहसीलदारांनी नायब तहसीलदार व सर्व महसूल कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतर सर्वांनी एकत्र बसून घटनेचा निषेध करीत काम बंद केले.
(तालुका प्रतिनिधी)
माजी मंत्री सुरेश धस यांनी दुपारी २.४५ वाजता मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांनी जामखेड नगर पालिकेच्या निविदेवरून मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. मी त्यांना कुलदैवताची शपथ घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या दरम्यान सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी एकत्र जमले. सर्वांनी निषेध करून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
-सुशिल बेल्हेकर,
तहसीलदार जामखेड.

Web Title: Ex-minister Dhas's tahsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.