इच्छुकांच्या यादीत दररोज भर
By Admin | Updated: October 13, 2016 00:44 IST2016-10-13T00:06:14+5:302016-10-13T00:44:29+5:30
अकोले : तालुक्यातील पंचायत समितीच्या बारा गणांपैकी केवळ दोन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून, अनुसूचित जमातीसाठी सहा

इच्छुकांच्या यादीत दररोज भर
अकोले : तालुक्यातील पंचायत समितीच्या बारा गणांपैकी केवळ दोन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून, अनुसूचित जमातीसाठी सहा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीन व अनुसूचित जातीसाठी एक अशा राखीव झाल्या. तसेच जिल्हा परिषद सहा गट असून, सर्वसाधारण प्रवर्गासाठी चार, तर सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी दोन गट राखीव असल्याने दिवसागणिक इच्छुकांची यादी वाढत चालली आहे. सत्तेचा सोपानाची स्वप्न अनेकांना दिवसाढवळ्या पडू लागली असून, इच्छुकांची भाऊगर्दी सर्व पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे.
तालुक्यात १४६ ग्रामपंचायतींत १८९ गावे असून, २ लाख ७२ हजार १३६ मतदार आहेत. यात अनुसूचित जातीचे ११ हजार ६७०, तर १ लाख ३८ हजार १६८ अनुसूचित जमातीचे मतदार आहेत. धामणगाव आवारी गट सर्वसाधारण व्यक्तीसाठी असल्याने येथे पुन्हा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कळस बुद्रुक गावात बैठक होऊन गावाने वाकचौरे यांचे पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतल्याचे समजते़ गतवेळी अडीचशे मतांनी पराभवास सामोरे गेलेल्या अनिता धुमाळ यांनी शिवसेनेकडून पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गटात सर्वाधिक मतदान धामणगाव आवारी येथे असून, या गावातील विद्यमान पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब आवारी यांची उमेदवारी तालुक्यातील सत्ताधारी राष्ट्रवादीला शह देऊ शकते. भाजपचे शिवाजी धुमाळ, काँग्रेसचे विक्रम नवले, सेवानिवृत्त प्राध्यापक विलास नवले आदींसह अगस्तीचे माजी उपाध्यक्ष प्रकाश नवले, बाळासाहेब भोर, राहुल देशमुख, अनिल सावंत अशी प्रत्येक गावातून दोन, चार इच्छुक आहेत.
धामणगाव आवारी व धुमाळवाडी दोन्ही गण अनु.जमातीसाठी राखीव असल्याने सेनेचे डॉ. शरद तळपाडे, माकपच्या लताबाई मेंगाळ यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे़
देवठाण गट खुल्या प्रवर्गासाठी असल्याने राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी सर्वांत जास्त रस्सीखेच आहे. यामुळे पुन्हा विद्यमान सदस्य परबत नाईकवाडी यांच्या गळ्यात उमेदवारी पडू शकते? पंचायत समिती सदस्य अरुण शेळके व अगस्तीचे माजी संचालक अशोक शेळके, मेहेंदुरी सोसायटीचे चेअरमन अरुण फरगडे, विकास शेटे, सूर्यभान सहाणे, तसेच ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे हेदेखील दावेदार असतील. भाजपचे जालिंदर वाकचौरे, दादापाटील वाकचौरे, रावसाहेब दळवी आदी इच्छुकांची मोठी यादी आहे.
(तालुका प्रतिनिधी)