तिहेरी हत्याकांडाला नेत्यांकडून जातीय वळण
By Admin | Updated: October 28, 2014 01:00 IST2014-10-28T00:18:49+5:302014-10-28T01:00:45+5:30
पाथर्डी : जवखेडे खालसा या साडेपाचशे कुटुंब संख्या असलेल्या गावात १९ जाती-जमातीचे नागरिक वर्षानुवर्षे एकत्र नांदत होते़ गावात कधीही तंटा होत नसल्यामुळे राज्य सरकारनेही

तिहेरी हत्याकांडाला नेत्यांकडून जातीय वळण
पाथर्डी : जवखेडे खालसा या साडेपाचशे कुटुंब संख्या असलेल्या गावात १९ जाती-जमातीचे नागरिक वर्षानुवर्षे एकत्र नांदत होते़ गावात कधीही तंटा होत नसल्यामुळे राज्य सरकारनेही या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार देऊन गौरविले़ मात्र, गावातीलच जाधव कुटुंबियांच्या तिहेरी हत्याकांडामुळे गाव बदनाम झाले असून, बाहेरुन येणारे नेते या हत्याकांडाला जातीय रंग देत आहेत़ त्यामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याची खंत जवखेडे खालसा ग्रामसभेत व्यक्त करण्यात आली़
चार हजार लोकसंख्या असलेल्या या गावात तब्बल १९ जाती-जमातीचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते़ मात्र, मागील आठवड्यात गावातील दलित कुटुंबातील तीघांची निघृणपणे हत्या झाली़ या हत्येनंतर गावावर जातीय हत्याकांडाचा कलंक लागला़ सोमवारी तहसिलदार सुभाष भाटे यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली़ सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तथा वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक उध्ववराव वाघ होते.
या ग्रामसभेत विविध वक्त्यांनी गावाच्या दृष्टीने ही घटना निंदणीय असल्याचे सांगितले़ गावामध्ये कधीही भांडण तंटा नाही़ दोन वर्षापूर्वी गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला़ कधीही जातीजातीत वाद झालेले नाही़ घटना घडल्यापासून ते अंत्यविधीपर्यंत गावातील प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उपस्थीत होता. गावात मुस्लीम समाज तीस ते पस्तीस टक्के आहे़ सर्व धर्माचे गुण्या गोविंदाने रहातात़ परंतु बाहेरचे नेते त्यांची दुकानदारी चालावी यासाठी गावात येवून गाव पेटवून देवू अशी घमकी देत आहेत़ वेगवेगळे आरोप करीत आहेत़ यामुळे गावकरी व्यथीत झालेले आहेत़ यातून गावात जातीय तणाव वाढू नये, यासाठी प्रशासनाने संबधीत नेत्यांना याची कल्पना देणे गरजेचे आहे. तपासकार्यात गावकरी पोलिसांना मदत करीत आहेत़
परंतु जे निरपराध आहेत त्यांना थर्ड डिग्री लावू नका, तपास लवकरात लवकर लागावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे़ परंतु बाहेरची मंडळी गावात येवून गावाला बदनाम करीत आहेत, याचे दु:ख व्यक्त करीत गावात सलोखा राखण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली़ ग्रामसभेच्या ठरावाचे निवेदन ग्रामस्थांनी तहसिलदार सुभाष भाटे यांना दिले. यावेळी अॅड. वैभव आंधळे, चारूदत्त वाघ, सुरेश वाघ, अमोल वाघ, इसाक भाई शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)