अत्यावश्यक सेवाही १४ दिवसांसाठी बंद करण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:36+5:302021-05-01T04:19:36+5:30
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, पंधरा दिवसांचा लॉकडाऊन केला, मात्र ...

अत्यावश्यक सेवाही १४ दिवसांसाठी बंद करण्याचा विचार
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, पंधरा दिवसांचा लॉकडाऊन केला, मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. या काळात रुग्णसंख्या कमी होणे अपेक्षित होते, मात्र ती वाढतच आहे. अत्यावश्यक सेवा सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवल्या. मात्र, लोक त्याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसले. जत्रा भरावी त्याप्रमाणे लोक गर्दी करत आहेत. यातून कोरोना कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाला आता कडक पावले उचलावी लागणार आहेत. पुढील १४ दिवसांसाठी जनता कर्फ्यू लोकांनी पाळावा. यात प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येतील. आरोग्यसेवा वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा १४ दिवसांसाठी बंद करण्याच्या विचारात प्रशासन आहे. तशा सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत.
केंद्र शासनाकडून रेमडेसिविर, ऑक्सिजन तसेच कोरोना संबंधित इतर आवश्यक बाबी हव्या तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे मोठा तुटवडा भासत आहे. राज्य शासन आपल्या परीने त्या मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, लोकांनी शासनाच्या या प्रयत्नांना साथ द्यावी. सुपर स्प्रेडर न होता घरात बसावे आणि ही साखळी तोडावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
--------------
तिसऱ्या लाटेचे नियोजन
सध्या असलेली स्थिती तसेच कोरोनाची येणारी तिसरी लाट लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने काही उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा नियोजन समिती निधीतून जिल्हा रुग्णालय, कर्जत, पाथर्डी, संगमनेर व श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्लांट उभारले जातील. त्यासाठी ११ कोटींची तरतूद केली आहे. महिनाभरात हे प्लांट सुरू होतील. याशिवाय जिल्हा रुग्णालयाला सात कोटी रुपये औषध खरेदीसाठी दिले आहेत. जिल्ह्यात टेस्ट किटचा तुटवडा आहे. परंतु, त्याच्याही खरेदीची तरतूद केलेली आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
----------
शिर्डीत ३०० बेड क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट
साईबाबा संस्थान तसेच अंबानी ग्रुपच्या सहकार्याने शिर्डीमध्ये मोठ्या ऑक्सिजन प्लांटची परवानगी मिळाली आहे. तीनशे बेडला पुरेल एवढा ऑक्सिजन हवेतून निर्माण करणारा हा प्लांट असून लवकरच तो कार्यरत होणार आहे. त्यामुळे पुढील काळात ऑक्सीजनचा तुटवडा भासणार नाही, असे ते म्हणाले.
----------
चढ्या भावानेही औषधे खरेदी करण्याची तयारी
सध्या औषध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नफेखोरी सुरू केली आहे. कृत्रिम टंचाई करून लोकांची लूट सुरू आहे. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्य शासन उपाययोजना करील. परंतु, सध्या लोकांची गरज लक्षात घेता आहे त्या भावात औषधे खरेदी करून लोकांचा जीव वाचवण्यावर शासनाचा भर आहे. त्यादृष्टीने औषधे खरेदीला प्राधान्य दिले जाईल, असे पालकमंत्री म्हणाले.
----------
त्यांना बाहेर काढा
जिल्ह्यात अनेक कोरोना रुग्ण अजून घरातच आहेत. घरात राहून ते अख्ख्या कुटुंबाला बाधित करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या लोकांना घरातून बाहेर काढून शासकीय विलगीकरण कक्षात ठेवावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.
------------
चढ्या बिलांचे ऑडिट करा
सध्या खासगी रुग्णालये अवाजवी बिले घेत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना सक्त ताकीद द्यावी, तसेच त्यांच्या बिलांचे ऑडिट करावे. चुकीचे करणाऱ्यांना धाक बसला पाहिजे, अशी उपायोजना करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.