साई काॅम्प्लेक्सचे अतिक्रमण त्वरित काढावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:37+5:302021-03-06T04:19:37+5:30
शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून स्वच्छता व आरोग्यकर जमा करण्यासाठी दोन टोलनाके उभारण्याचा ठराव विशेष सर्वसाधारण सभा घेऊन केवळ सहा नगरसेवकांच्या ...

साई काॅम्प्लेक्सचे अतिक्रमण त्वरित काढावे
शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून स्वच्छता व आरोग्यकर जमा करण्यासाठी दोन टोलनाके उभारण्याचा ठराव विशेष सर्वसाधारण सभा घेऊन केवळ सहा नगरसेवकांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आला. या सभेला केवळ सहा नगरसेवक उपस्थित होते. नियमानुसार कोरम पूर्ण होत नसून ही सभा व यात मंजूर केलेला ठराव हा बेकायदेशीर असून रद्द करावा.
नगरपंचायत प्रशासन खंडोबा मंदिरालगत असणाऱ्या अतिक्रमित हातगाड्या व इतर दुकानांवर कारवाई करीत असताना नगरपंचायतीचे एक नगरसेवक आले. त्यांनी अतिक्रमणातील व्यावसायिक हे माझ्या वार्डातील असून तुम्ही इतर ठिकाणचे अतिक्रमण काढावे व नंतरच इथे कारवाई करावी असे म्हणत कर्मचारी व अधिकारी यांच्याबरोबर शाब्दिक हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणला, ह्या सर्व प्रकरणाचे चित्रीकरण करण्यात आले, या घटनेविषयीची सर्व माहिती मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्याकडे मी तक्रार करूनही त्यांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे या घटनेच्या चित्रीकरणाचा पुरावा आपल्याला देत असून ते नगरसेवक दत्तात्रय कोते व मुख्याधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
साई मंदिरालगत असणाऱ्या साई कॉम्प्लेक्सच्या चारही बाजूने लोकांनी अतिक्रमणे करून व्यवसाय मांडले आहेत. त्यामुळे कॉम्प्लेक्समध्ये ग्राहकच येऊ शकत नाहीत. परिणामी व्यवसाय होत नाही. वेळोवेळी तक्रार करूनही नगरपंचायत प्रशासन लक्ष देत नाही. काही नगरसेवक या अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असल्याने यात वाढच होत आहे. अतिक्रमणासंदर्भात आपण कडक कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शिवसेना नेते कमलाकर कोते, राहुल गोंदकर, सचिन कोते, सुनील बारहाते, विलास कोते, नवनाथ विश्वासराव, विरेश गोंदकर, प्रसाद कोते, अशोक गोंदकर, जयराम कांदळकर यांची नावे आहेत.
०५शिर्डी