उपमहापौर पदासाठी खासदारांचे दबावतंत्र

By Admin | Updated: June 9, 2016 23:40 IST2016-06-09T23:36:56+5:302016-06-09T23:40:10+5:30

अहमदनगर : भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी त्यांचे चिरंजीव सुवेंद्र यांना उपमहापौरपद मिळावे यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Empowerment of MPs for Deputy Mayor's post | उपमहापौर पदासाठी खासदारांचे दबावतंत्र

उपमहापौर पदासाठी खासदारांचे दबावतंत्र

अहमदनगर : भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी त्यांचे चिरंजीव सुवेंद्र यांना उपमहापौरपद मिळावे यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आगरकर गटाच्या नगरसेवकांनी गांधी यांच्या नावाला विरोध केल्यानंतर अपक्षांना सोबत घेत गांधी यांनी पक्षावर दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. गांधी व आगरकर गटाच्या नगरसेवकांनी स्वतंत्रपणे मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेवून उपमहापौर पदावर दावा केला आहे.
आगरकर गटाचे सावेडीतील पाच नगरसेवक सेनेसोबत सहलीवर रवाना झाले आहेत. उपमहापौर पद सुवेंद्र गांधी यांना देण्यास या नगरसेवकांचा विरोध असून सावेडीतील कोणत्याही एका नगरसेवकाला उपमहापौर पद देण्याची मागणी दत्ता कावरे, बाबासाहेब वाकळे, उषा नलावडे, मनिषा बारस्कर, महेश तवले यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडे मुंबई भेटीत केली आहे. प्रदेश पातळीवर चर्चा करून निर्णय कळवितो, असे आश्वासन दानवे यांनी नगरसेवकांना दिले आहे.
त्यानंतर गांधी गटाचे श्रीकांत साठे, संतोष बोरा, जगन्नाथ निंबाळकर यांनीही प्रदेशाध्यक्ष दानवे यांची भेट घेतली. उपमहापौर पदासाठीच ही भेट होती. मात्र त्यांनाही दानवे यांनी ठोस निर्णय दिला नाही. पक्षाचे निरीक्षक नगरमध्ये येतील. त्यांच्या अहवालानंतर उपमहापौर पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, असे दानवे यांनी सांगितल्याचे सूत्रांकडून समजते.
पक्षाने निर्णय घेतल्यास ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवकाला उपमहापौर पदाची संधी दिली जाईल. बाबासाहेब वाकळे, मालन ढोणे यांनी यापूर्वी महापालिकेत सभापती पदे भोगली आहेत. नंदा मनेष साठे यांची सलग तिसरी टर्म असली तरी त्यांना एकदाही महापालिकेत पदाची संधी दिलेली नाही. त्यामुळे त्यांचे नाव पक्षाकडून ऐनवेळी पुढे केले जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान सुवेंद्र यांनाच उपमहापौर पद मिळावे यासाठी खासदार दिलीप गांधी यांनी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. गांधी यांनी महापालिकेतील चार अपक्ष नगरसेवकांसोबत चर्चा सुरू केली आहे.
गांधी गटाचे नंदा साठे, सुवेंद्र गांधी, श्रीपाद छिंदम,मालन ढोणे,चार अपक्ष असे ८ नगरसेवक एकत्र करून गांधी यांनी उपमहापौर पदासाठी पक्षावर दबावतंत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आगरकर गटाच्या नगरसेवकांना उपमहापौर पद मिळू द्यायचे नाही हा एकमेव हेतू त्यामागे असल्याचे सूत्रांकडून समजले.
(प्रतिनिधी)

Web Title: Empowerment of MPs for Deputy Mayor's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.