कंपन्यांनी दिला एक लाख स्थानिकांना रोजगार
By Admin | Updated: June 11, 2014 00:18 IST2014-06-10T23:44:14+5:302014-06-11T00:18:31+5:30
एमआयडीसी : ९० टक्के स्थानिक कामगार

कंपन्यांनी दिला एक लाख स्थानिकांना रोजगार
अण्णासाहेब नवथर, अहमदनगर
येथील उद्योग बंद पडले़ त्यामुळे रोजगार नाही़ परिणामी येथील नागरिकांनी रोजगारासाठी इतर शहरांची वाट धरली आहे़ मात्र येथील लहान, मोठे आणि मध्यम उद्योगांनी एक लाख दहा हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून, रोजगारात साखर कारखान्यांचा वाटा मोठा आहे़
नगर शहरातील मोठे उद्योग बंद पडले़ काहींनी येथील युनिट बंद करून इतर ठिकाणी जम बसविला़ एक-एक करत उद्योजक निघून गेले़ औद्योगिक वसाहत ओस पडली़ त्यामुळे कुशल कामगारांवर घरी बसण्याची वेळ आली़ काही इतर शहरांत स्थायिक झाले़ तर काहींनी इथेच छोटा- मोठा उद्योग सुरू केला़ पात्रता असूनही हाताला काम न मिळाल्याने अनेक तरुण बाहेरगावी गेले़उद्योग क्षेत्रात उदासीनता असली तरी छोट्या उद्योगांनी कामगारांच्या हाताला काम दिले आहे़ स्थानिक कामगार काम करत नाही,अशी ओरड उद्योजक करत आहेत़ असे असूनही एक लाख दहा हजार स्थानिक कामगार विविध कंपन्यांत कार्यरत आहेत़ जिल्हा उद्योग केंद्राच्या अहवालानुसार छोट्या उद्योगात सर्वाधिक रोजगार निर्माण झाला आहे़ रोजगार उपलब्ध करून देण्यात छोटे उद्योग पुढे आहेत़ त्यापाठोपाठ लघु उद्योगात १० हजार ७३८ स्थानिक कामगार कार्यरत आहेत़ मध्यम उद्योगात अत्यंत कमी एक हजार ४५६ कामगार कार्यरत आहेत़ विशाल उद्योगात मात्र २१ हजार कामगार कार्यरत आहेत़ जिल्ह्यात नागापूर, सुपा आणि नेवासा येथे औद्योगिक वसाहती आहेत़ याशिवायही लहान व मोठे उद्योग जिल्ह्यात सुरू आहेत़ लहान व मोठ्या स्वरुपाचे जिल्ह्यात ६५२७ कारखाने सुरू आहेत़ यामध्ये सर्वाधिक रोजगार उपलब्ध झाला असून, मोठ्या उद्योगांची रोजगाराची उणीव काही अंशी या कंपन्यांनी भरून काढली़यामध्ये जिल्हाभर असलेल्या साखर कारखान्यांतील कामगारांची संख्याही मोठी आहे़ साखर कारखान्यांमुळे नगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असून, सर्वाधिक कामगार स्थानिक आहेत़ साखर कारखान्यांमुळे शहरापेक्षा खेड्यात चांगली सुधारणा झाली असून, ग्रामीण भागात कामगारांची संख्याही मोठी आहे़
स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणे कंपनी व्यवस्थापनावर बंधनकारक आहे़ त्यामुळे ८० टक्के स्थानिक कामगार घेतले जातात़ पण यापेक्षाही अधिक कामगार असण्याची शक्यता आहे़
- हरजितसिंग वधवा,
उद्योजक
उद्योगात स्थानिक कामगारांची संख्या कमी आहे़ स्थानिक कामगार काम करत नाहीत,अशी उद्योजकांची तक्रार आहे़ त्यामुळे आसाम,बिहारमधील कामगार येथील कंपन्यांत काम करत असून, सर्वेक्षण करण्याची मागणी कामगार कार्यालयाकडे करण्यात आली आहे़
- योगेश गलांडे, अध्यक्ष,
स्वराज्य कामगार संघटना