कर्मचाऱ्यांचे मतदान स्वतंत्र मोजू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST2021-01-17T04:18:55+5:302021-01-17T04:18:55+5:30
अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान स्वतंत्रपणे जाहीर न करता ते एकत्रितपणे जाहीर करावे, अशी ...

कर्मचाऱ्यांचे मतदान स्वतंत्र मोजू नये
अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान स्वतंत्रपणे जाहीर न करता ते एकत्रितपणे जाहीर करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या वर्षी प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांनी सर्वच संघटनांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून निवडणूक कामी नियुक्त असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलटची सुविधा उपलब्ध करून दिली होती, परंतु ग्रामपंचायत निवडणूक विधानसभा, लोकसभा निवडणुकांपेक्षा वेगळी असते. वॉर्डनिहाय मतदानप्रक्रिया असल्यामुळे एखाद्या वार्डात एक किंवा दोनच कर्मचारी मतदार असतात. ग्रामपंचायत निवडणुकांचे निकालही कमी मतांच्या फरकांनी लागतात. निवडून येणारे उमेदवार व पराभूत होणारे उमेदवार यांच्यातील मतांचा फरक अल्प असतो.
पोस्टल बॅलटचे मतदान स्वतंत्ररित्या मोजल्यामुळे सदर कर्मचाऱ्याने कोणत्या उमेदवाराला मत दिले, हे समजत असल्यामुळे कमी मताने पराभूत होणाऱ्या उमेदवाराच्या रोषाला कर्मचाऱ्याला नाहक बळी जावे लागणार आहे. म्हणूनच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने राज्य निवडणूक आयोग, तसेच अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना तातडीने निवेदन दिले. सर्व कर्मचाऱ्यांचे मतदान मोजून पोस्टल बॅलटची स्वतंत्र आकडेवारी जाहीर न करता, ती आकडेवारी मतदानयंत्रांच्या मतांमध्ये धरून एकत्रित जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, कार्याध्यक्ष राम निकम, सरचिटणीस दत्तात्रय गमे, कोषाध्यक्ष तुषार तुपे व कार्यालयीन चिटणीस गणेश वाघ यांनी उपस्थित होते.