ग्रामीण रुग्णालयात रविवारी ऑक्सिजन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम रद्द करून रुग्णालयात खासदार सातव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आमदार कानडे यांनी प्रकल्पाच्या थेट कामाचे आदेश यावेळी संबंधित ठेकेदार कंपनीला दिले. काँग्रेस नेते सचिन गुजर, उपनगराध्यक्ष करण ससाणे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, योगेश बंड यावेळी उपस्थित होते. शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनीही यावेळी खासदार सातव यांना श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी आमदार कानडे म्हणाले, राज्य आपत्कालीन निधीतून १२८ ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती क्षमतेचा हा प्रकल्प साकारला जात आहे. यापूर्वी स्थानिक विकास निधीतून आपण रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता करून दिली होती. मात्र विस्तारित प्रकल्पामुळे बेडची संख्या दीडशेवर जाणार आहे. या वाढीव बेड्सकरिता निवाऱ्याचे बांधकाम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. संपूर्ण आमदार निधी शासकीय आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकरिता खर्च करण्याची आपली तयारी आहे.
दरम्यान, खासदार सातव यांच्या निधनाबद्दल आमदार कानडे यांनी वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी सतीश बोर्डे, विलास थोरात, लकी सेठी, अशोक थोरे आदी उपस्थित होते.