पंचवीस लाखांचा अपहार, माजी सरपंचाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:05+5:302021-07-14T04:25:05+5:30
घारगाव (जि. अहमदनगर) : ग्रामसेवकाच्या मदतीने २५ लाख २१ हजार ९११ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सारोळे पठार येथील तत्कालिन सरपंच ...

पंचवीस लाखांचा अपहार, माजी सरपंचाला अटक
घारगाव (जि. अहमदनगर) : ग्रामसेवकाच्या मदतीने २५ लाख २१ हजार ९११ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सारोळे पठार येथील तत्कालिन सरपंच व ग्रामसेवक यांच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. यातील दोन्ही आरोपी फरार होते. रविवारी (दि. ११) रात्री पोलिसांनी सारोळे पठार येथून माजी सरपंचाला अटक केली तर ग्रामसेवक अद्याप फरार आहे.
प्रशांत गवराम फटांगरे असे अटक केलेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुन्हा दाखल असलेला तत्कालिन ग्रामसेवक सुनील शेळके हा पसार आहे. माजी सरपंच फटांगरे आणि तत्कालीन ग्रामसेवक शेळके या दोघांनी २०१४-१५ तेे २०१७-१८ या कालावधीत शासकीय निधीतून कामे न करता २५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. अमित बादशहा फटांगरे यांनी ग्रामपंचायत निधीत अपहार झाल्याची तक्रार केली होती. तक्रारीची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय समिती गठीत केली होती. या समितीने आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता केल्याचा अहवाल दिला होता. या अहवालावर माजी सरपंच फटांगरे याचे म्हणणे मागितले असता त्याने काही म्हणणे सादर केले नव्हते.
कामाचे अंदाजपत्रक घेणे, मूल्यांकन करणे, कामांना ग्रामपंचायत सभेची मान्यता घेणे, या बाबींची पूर्तता न करता माजी सरपंच फटांगरे याने ११ लाख ७२ हजार रुपये स्वत:च्या नावाने धनादेश काढले. तसेच संयुक्त जबाबदारी असलेल्या खात्यातून काढलेल्या ५० टक्के रकमेलाही त्यांना जबाबदार धरण्यात आले होते. अशा प्रकारे माजी सरपंचाने १६ लाख १३ हजार, तर ग्रामसेवकाने ९ लाख ८ हजार असा एकूण २५ लाख २१ हजार रुपयांचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एकूण ८२ वेळा माजी सरपंचाने स्वत:च्या नावाने पैसे काढल्याचे चौकशीत समोर आले होते. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत, पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे, गणेश तळपाडे यांनी माजी सरपंच फटांगरे याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.