अधिकाऱ्यांवर आगपाखड
By Admin | Updated: July 15, 2014 00:45 IST2014-07-14T23:02:54+5:302014-07-15T00:45:14+5:30
पाथर्डी : टंचाई आढावा बैठकीत गावोगावच्या सरपंच व ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासन आणि महावितरणच्या कारभारावर आगपाखड करीत अनेक बाबींचे पुरावेच ग्रामस्थांनी बैठकीत सादर केले़
अधिकाऱ्यांवर आगपाखड
पाथर्डी : टंचाई आढावा बैठकीत गावोगावच्या सरपंच व ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासन आणि महावितरणच्या कारभारावर आगपाखड करीत अनेक बाबींचे पुरावेच ग्रामस्थांनी बैठकीत सादर केले़ त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांसह तहसिलदारांनी पंचायत समिती व महावितरणच्या अधिकाऱ्यांना तंबी भरीत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या़
सोमवारी दुपारी तहसील कार्यालयात टंचाई आढावा बैठक झाली़ बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ़ चंद्रशेखर घुले होते़ बैठकीत पं.स. सदस्य विष्णूपंत पवार, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, सिताराम बोरूडे, नवनाथ चव्हाण, रामराव चव्हाण, नगरसेवक संजय भागवत, माजी नगरसेवक बंडू बोरूडे, बाळासाहेब दराडे, मालेवाडीचे सरपंच माणिक किर्तणे, आल्हनवाडीचे सरपंच मच्छिंद्र गव्हाणे आदींनी पंचायत समिती, महावितरण व कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा कारभार पुराव्यानिशी उघडकीस आणला़ दीड वर्ष झाले तरी ट्रान्सफॉर्मर मिळत नाहीत, अनेक दिवस मागणी करूनही पिण्याचे पाणी मिळत नाही, अधिकारी एैकत नाहीत, मुख्यालयात थांबत नाहीत आदी तक्रारी केल्या. लोक मेल्यावर पाणी देणार का असा संतप्त सवाल करीत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवार धरले़ आ़ घुले, प्रांताधिकारी ज्योती कावरे यांनीही अधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याची तंबी दिली़ आ. घुले यांनी सध्या अत्यंत भीषण परिस्थीती निर्माण झाली असून अधिकाऱ्यांनी टंचाई काळात मागेल त्या गावाला ४८ तासात टँकर दिला पाहिजे़ यात अधिकाऱ्यांनी हयगय करू नये. टंचाई काळात कोणत्याही अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचना केल्या़
प्रांताधिकारी ज्योती कावरे यांनी सर्वखात्यांमार्फत चालू असलेल्या कामांचा आढावा घेतला़ तसचे तालुक्यात ७९ पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरु असल्याची माहिती बैठकीत दिली.
बैठकीस सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी हजर न राहिल्याने त्यांना नोटीस काढण्याचे फर्मान आ. घुले यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले. तहसिलदार एस. बी. भाटे, गटविकास अधिकारी यशवंत सदावर्ते आदिंसह विविध खात्याचे प्रमुख उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)