अकरा सदस्य अपात्र

By Admin | Updated: July 22, 2014 00:08 IST2014-07-21T23:18:11+5:302014-07-22T00:08:36+5:30

श्रीगोंदा : निवडणूक खर्च मुदतीत सादर न केल्यामुळे तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्राबाई पवार, उपसरपंच शकीला पिरजादे यांच्यासह १० ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यपद रद्द झाले आहे़

Eleven members ineligible | अकरा सदस्य अपात्र

अकरा सदस्य अपात्र

श्रीगोंदा : निवडणूक खर्च मुदतीत सादर न केल्यामुळे तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्राबाई पवार, उपसरपंच शकीला पिरजादे यांच्यासह १० ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यपद रद्द झाले आहे़ अपात्र ठरलेल्या ११ जणांमध्ये काँग्रेसच्या १० तर राष्ट्रवादीच्या एका सदस्याचा समावेश आहे.
पेडगाव ग्रामपंचायतीत १३ सदस्य़ आहेत़ २३ नोव्हेंबर २०१२ रोजी पेडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती़ या निवडणुकीत काँग्रेसला १० तर राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या होत्या. विजयी व पराभूत उमेदवारांनी निवडणूक झाल्यानंतर खर्च एक महिन्याच्याआत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे़ मात्र, या सदस्यांनी निवडणूक आयोगाला वेळेत निवडणूक खर्च सादर केला नाही़ त्यामुळे भगवान कणसे, नारायण कणसे, सुनिल खेडेकर, बंडु जाखडे, रावसाहेब गोंधडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या अकरा सदस्यांना नोटीसा बजावल्या होत्या़ या नोटीसीला समाधानकारक उत्तर न देता आल्यामुळे या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे़ जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम नुसार सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विनोद सरवटे, पुष्पा खेडेकर, दत्तात्रय ओगले, अशोक गोधडे, राजेंद्र खेडकर, शहनाजबी शेख, सुर्यमाला शिंदे, विजया नवले (काँग्रेस), दादासाहेब शिर्के यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यावर बंदी घातली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे सदस्य नारायण झिटे व आरती कुदळे यांना अभय मिळाले. मात्र राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फटका दादासाहेब शिर्के यांना बसल्याची चर्चा आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अपात्र ठरविलेल्या ११ सदस्यांनी आयुक्तांकडे धाव घेतली आहे. आयुक्त काय निर्णय देतात त्यावर या ११ सदस्यांचे भवितव्य अवलंबून आहे़ (तालुका प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीवर बरखास्तीची टांगती तलवार
एकूण १३ सदस्य असलेल्या पेडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह १० सदस्य जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहेत़ त्यामुळे ग्रामपंचायतीवर बरखास्तीची नामुस्की ओढावणार आहे़
आयुक्तांच्या निर्णयावरच ग्रामपंचायत बरखास्त करायची की नाही, याचा निर्णय अवलंबून राहणार आहे़ त्यामुळे या सदस्यांच्या सदस्यत्वाबरोबर ग्रामपंचायत बरखास्तीवरही टांगती तलवार आहे़

Web Title: Eleven members ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.