आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये ३० वर्षांनंतर होणार निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:06 IST2021-01-08T05:06:38+5:302021-01-08T05:06:38+5:30
केडगाव : ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे तर देशाला दिशादर्शक असणारे आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथे ३० वर्षांची बिनविरोध ...

आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये ३० वर्षांनंतर होणार निवडणूक
केडगाव : ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे तर देशाला दिशादर्शक असणारे आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथे ३० वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली आहे.
ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात उतरल्याने या गावात दुरंगी लढत होत आहे. हिवरे बाजार गावात पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे १९९o पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही. गावची ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या निवडणुका नेहमी बिनविरोध होत आहेत; मात्र यंदा प्रथमच गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधची परंपरा तीस वर्षांनंतर खंडित झाली आहे. देशातील इतर गावांसाठी याच गावातील बिनविरोध निवडणुकीचे तंत्र प्रेरणादायी होते; मात्र यात यावेळी खंड पडला आहे.
---------
कोणत्याच पक्षाचे बूथ न लागणाऱ्या गावात निवडणूक
आदर्श गाव हिवरे बाजारचा बिनविरोध निवडणुकीचा कानमंत्र फक्त गावातीलच नव्हे तर राज्यस्तरीय व राष्ट्रीय निवडणुकीत पाळला जात होता. गावकरी एकोप्याने गावातील निवडणूक हाताळत होते. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत या गावात कधीच कोणत्या पक्षाचे बूथ लागले नाही किंवा कोणत्या पक्षाचे पोलिंग एजन्ट नव्हते. देशातील हे दुर्मीळ उदाहरण असावे आणि नेमक्या याच गावाला प्रथमच निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.
---
निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आमच्या ग्रामपंचायतीची निवडणूकही त्याच पद्धतीने होत आहे. ही निवडणूक आदर्श पद्धतीनेच होईल.
-पोपटराव पवार,
माजी सरपंच, हिवरे बाजार.