निवडणुकीत पैशांचा ‘अधिकृत’ महापूर
By Admin | Updated: November 28, 2014 01:15 IST2014-11-28T00:46:44+5:302014-11-28T01:15:26+5:30
अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात अक्षरश: पैशांचा महापूर वाहिला़ जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील १३५ उमेदवारांनी

निवडणुकीत पैशांचा ‘अधिकृत’ महापूर
अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात अक्षरश: पैशांचा महापूर वाहिला़ जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील १३५ उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारावर तब्बल ७ कोटी ६३ लाख ९२ हजार रुपये खर्च केल्याचे जिल्हा निवडणूक शाखेच्या अहवालावरून उघड झाले आहे़ नेवासा मतदारसंघात सर्वाधिक ८३ लाख रुपयांचा चुराडा झाला असून,पाथर्डीत सर्वात कमी ३६ लाख ८८ हजार रुपये प्रचारावर खर्च झाले आहेत़
जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी तब्बल १३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ आघाडी व युतीने ‘एकला चलो रे’ची हाक दिल्याने पहिल्यांदाच उमेदवारांची एवढी संख्या वाढली़ चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्याने दिग्गजांचा कस लागला़ जिल्ह्यातील साखर सम्राटांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती़ त्यामुळे निवडणुकीत पैशांचा महापूर येणार असल्याची अपेक्षा सर्वांनाच होती आणि घडलेही तसेच़ प्रस्थापितांनी राजकारणात बसविलेले गेल्या अनेक दिवसांचे बस्तान कायम ठेवण्यासाठी निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला़ खर्चासाठी हात मोकळा सोडूनही काहींच्या पदरी निराशाच आली़ तर काहींनी कमी खर्चात निवडणुकीत बाजी मारली़ जिल्ह्यातील काही मतदारसंघात मनी फॅक्टर चालला नाही़ निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब पाहिल्यास हे प्रकर्षाने जाणवते़ जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचारावर मोठा खर्च झाला़ परंतु उमेदवारांनी प्रशासनाच्या चौकटीत बसेल, एवढाच खर्च केला असून, एकानेही खर्चाची २८ लाखांची लक्ष्मण रेषा ओलांडली नाही़ त्यामुळे विजयी व पराभूत उमेदवारांची निवडणुकीनंतरच्या कारवाईतून सुटका झाली आहे़
(प्रतिनिधी)