आठ वर्षाच्या मुलाची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST2021-04-29T04:16:20+5:302021-04-29T04:16:20+5:30
कोतूळ : सध्या राज्यभर ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि योग्य उपचार न मिळाल्याने अनेक कोरोना रुग्ण दगावत आहेत. कोतूळ ग्रामीण रुग्णालयात ...

आठ वर्षाच्या मुलाची कोरोनावर मात
कोतूळ : सध्या राज्यभर ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि योग्य उपचार न मिळाल्याने अनेक कोरोना रुग्ण दगावत आहेत. कोतूळ ग्रामीण रुग्णालयात धोकादायक ऑक्सिजन पातळीवरील रुग्ण ऑक्सिजनशिवाय बरे झाले आहेत. ४५ पैकी ४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आठ वर्षाच्या मुलाने कोरोनावर मात केल्याने कोतूळ ग्रामीण रुग्णालय तालुक्यात रोल माॅडेल ठरत आहे.
कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात केवळ २ डाॅक्टर आणि ७ ते ८ कर्मचारी आणि ३० बेडचे कोरोना उपचार केंद्र चालवत आहेत. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असला तरी आहे, त्यात रुग्णांची काळजी योग्य उपचार होत असल्याने आर्थिक स्थिती चांगली असलेले व्यापारी, सरकारी नोकर इथेच उपचार घेत आहेत.
कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात पंधरा दिवसांपूर्वी कोरोना उपचार केंद्र सुरू झाले. तीस खाटांची क्षमता असलल्या या रुग्णालयात ऑक्सिजन बेड नाही. परिसरात मोठे खासगी हाॅस्पिटल नसल्याने आदिवासी व गोरगरिबांना हे एकमेव उपचार केंद्र आहे.
कोतूळ केंद्रात चाळीस गावांत पंधरा दिवसांपासून सरासरी पंधरा रुग्ण पाॅझिटिव्ह निघतात. काही शहरात खासगीत तर काही गावातील विलगीकरण कक्षात उपचार घेतात.
यातील मध्यम तीव्रतेचे रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतात बेड, पंखे, एकवेळ नास्ता, दोन वेळा जेवण दिले जाते.
डाॅ. कृष्णा वानखेडे, डाॅ. मंजुशा तागड हे उपचार करत आहेत. कोतूळ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड नसताना ८० ते ८५ ऑक्सिजन पातळी असलेले बारा रुग्ण पूर्ण बरे झाले. २० सौम्य रुग्ण बरे झाले. बाकी रुग्ण ८ ते १० रुग्ण दोन दिवसांत घरी जाणार आहेत. अपवाद म्हणून केवळ दोन ८० वर्षे वयाच्या वृध्दांची ऑक्सिजन पातळी तीसपर्यंत आल्याने ते दगावले.
कर्मचारी सुशील धोत्रे, सर्जेराव खंडागळे, संजय बचाटे, विकास वनवे, संदीप पठारे, ए. के. देठे, सुनील पवार, स्वप्नील राक्षे हे रुग्णांवर उपचार करत आहेत.
.............
इथे येणारा प्रत्येक रुग्ण अत्यंत गरीब कुटुंबातील असतो. आम्ही त्याची स्थिती पाहून इथेच उपचार करतो. वेळेत औषधोपचार, गरजेनुसार इंजेक्शन, जेवण, स्वच्छता या बाबींची काळजी घेतो त्यामुळे लवकर रुग्ण बरे होतात. -
डाॅ. मंजुषा तागड, वैद्यकीय अधिकारी
............
कोतूळ परिसरात प्रदूषण पातळी खूप कमी आहे. शिवाय परिसरात निसर्ग व जंगलात वृक्ष असल्याने हवा शुद्ध राहते अशी हवा रुग्ण बरे व्हायला फायदेशीर ठरते. ८० ते ८२ प्राणवायू पातळी असलेले बारा रुग्ण बरे झाले. एका आठ वर्षाच्या मुलाची काळजी घेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर शिवाय कोरोमुक्त केले, याचा आनंद आहे.
- डाॅ. कृष्णा वानखेडे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी