पाथर्डीतील हाणामारीत आठ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:34+5:302021-05-27T04:22:34+5:30
पाथर्डी : शहरातील अजंठा चौकात मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास दोन गटात तलवारीने झालेल्या तुंबळ हाणामारीत शिरसाठवाडी व भिकनवाडा अशा ...

पाथर्डीतील हाणामारीत आठ जखमी
पाथर्डी : शहरातील अजंठा चौकात मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास दोन गटात तलवारीने झालेल्या तुंबळ हाणामारीत शिरसाठवाडी व भिकनवाडा अशा दोन्ही गटातील आठजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या. यामध्ये जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
पहिली फिर्याद गणेश बाळासाहेब शिरसाठ यांनी दिली. बाळासाहेब शिरसाठ, महादेव बाळासाहेब शिरसाठ, नितीन नवनाथ शिरसाठ, नवनाथ यशवंत शिरसाठ (रा. शिरसाठवाडी) हे अजंठा चौकात दूध विक्री करत होते. त्यावेळी भिकनवाडा येथील मुन्ना निजाम पठाण यांच्या वाहनाचा धक्का लागून दूध सांडल्याचा जाब विचारल्याचा राग येऊन फारुख रफीक शेख, लाला रफीक शेख, निजाम रफीक शेख, जुबेर फारूख शेख, छोट्या राजू पठाण, जुबेर शफीक आतार, मुन्ना शेख, भैया शेख, काल्या निजाम शेख, रंगनाथ गायकवाड, सोहेल पठाण, बब्बू रिक्षावाला, सुरज दहीवाले, असिफ शेख व इतर १० ते १२ जणांनी बाळासाहेब शिरसाठ व त्यांच्या सहकाऱ्यांना तलवार, चाकू, लोखंडी गज, लाठ्या-काठ्याने जबर मारहाण केली. त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी फिर्याद अमीर ऊर्फ मुन्ना निजाम शेख यांनी दिली. अमीर शेख यांच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या रागातून त्यांचे सहकारी तौफिक शेख, रंगनाथ गायकवाड, जुबेर शेख यांना गोकुळ शिरसाठ, देवा शिरसाठ, प्रवीण शिरसाठ, गणेश शिरसाठ, नितीन शिरसाठ, संजय शिरसाठ यांच्यासह १० ते १२ जणांनी तलवार, लोखंडी गज, लाठ्या-काठ्याने जबर मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये आठजण गंभीर जखमी झाले आहेत.
---
२५ दुचाकींचे नुकसान, रस्त्यावर दगडांचा खच
यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत वीस ते पंचवीस दुचाकींचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर दगडांचा खच पडला होता. अचानक झालेल्या धुमश्चक्रीने नागरिकांची पळापळ झाली. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी भेटी दिल्या.
दरम्यान, पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.