पेडगावच्या बहादूरगडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:40 IST2021-02-21T04:40:19+5:302021-02-21T04:40:19+5:30
श्रीगोंदा : छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा पेडगावचा बहादूरगड साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेडगावी गनिमी कावा वापरत २०० ...

पेडगावच्या बहादूरगडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार
श्रीगोंदा : छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा पेडगावचा बहादूरगड साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेडगावी गनिमी कावा वापरत २०० अरबी घोडे व एक कोटीचा शाही खजिना मिळविला होता. हा परिसर पराक्रमी व स्वाभिमानी इतिहास सांगत आहे. अशा बहादूरगडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी शनिवारी केले.
टीम धर्मवीरगड, शिवदुर्ग संवर्धन, पेडगाव (ता. श्रीगोंदा) ग्रामस्थ व समस्त शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सवाचे आयोजन केले होते.
यावेळी सयाजी शिंदे, सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व टीम धर्मवीरगड पेडगाव यांच्याद्वारे ४०० रोपांचे रोपण केले. यावेळी सयाजी शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
पेडगाव किल्ल्यातील ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी टीम धर्मवीरगड कार्यरत आहे. या गडाचे संवर्धन टीम धर्मवीरगड व सात वर्षांपासून श्री शिवदुर्ग संवर्धन करीत आहे. टीम धर्मवीरगडने संवर्धनासाठी अनेक कामे केली आहेत. ७५ गावांतील टीम तयार करून स्मारकाचे ३६५ दिवस नित्याने पूजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून टीम धर्मवीरगडने २० सिमेंटी खुर्च्या, २ पाणपोई, स्मारक परिसर लॉन, ५ सिमेंट नळ्यांचे आउटलेट, ३ कचराकुंडी, कटर मशीन, कुऱ्हाडी, कोयते, खुरपे, खोरे, कुदळ, टिकाऊ, घमेले, १०० भगवे ध्वज, पाच हजार लिटर पाण्याची टाकी, एक हजार फूट ठिबक सिंचन पाईप, २ पाणी बॅरल, आदी वस्तूंचे अनावरण करीत किल्याच्या सेवेत रुजू केले.
पाताळेश्वर मंदिर लोखंडी प्रवेशद्वार व श्री छत्रपती संभाजीराजे उद्यान निर्माण केले आहे. भविष्यात किल्ल्यात प्रकाश व्यवस्था, छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, छत्रपती संभाजी महाराज खेळणीघर पुरातत्त्व खात्याच्या सल्ल्याने निर्माण केली जाणार आहेत.
टीमने गडाची माहिती देणारी दिनदर्शिका बनविली आहे. या अनोख्या गडसंवर्धन शिवजयंतीप्रसंगी बाळासाहेब पानसरे, भगवान कणसे, देविदास शिर्के, हरिभाऊ जगताप, तेजस खेडकर, सचिन झिटे, सिद्धांत खेडकर, रोहित कणसे, भाऊ घोडके, रोहित नवले, नंदकिशोर क्षीरसागर, मच्छिंद्र पंडित, अशोक गोधडे, राहुल परकाळे, डाळिंबकर, अनिकेत लगड, किरण दळवी, माउली वाघमोरे, प्रवीण कापसे, आदी उपस्थित होते.
---
२० पेडगाव
पेडगाव येथील बहादूरगडावर शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.