प्रत्येक ग्रामपंचायतीला देणार धूर फवारणी यंत्र
By Admin | Updated: November 18, 2014 15:04 IST2014-11-18T15:04:08+5:302014-11-18T15:04:08+5:30
औषधांचा साठा ते वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांकडून रुग्णांना मिळणारी वागणूक यांच्या नोंदी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी दिली.

प्रत्येक ग्रामपंचायतीला देणार धूर फवारणी यंत्र
अहमदनगर : जिल्हा परिषद सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. औषधांचा साठा ते वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांकडून रुग्णांना मिळणारी वागणूक यांच्या नोंदी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी दिली.
आरोग्य समितीच्या मासिक सभेनंतर उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती शेलार बोलत होते. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.बी. गंडाळ उपस्थित होते. सुरूवातीला जिल्ह्यातील डेंग्यूच्या साथीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात १३६ जणांना डेंग्यूची लागण झाली असून त्यातून १३ रुग्ण दगावलेले आहेत. यामुळे ग्रामीण भागात दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकें द्राची तपासणी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. यात त्या ठिकाणी असणारी दैनंदिन बाह्य रुग्णांची संख्या, होणार्या शस्त्रक्रिया, लाभार्थ्यांना शस्त्रक्रियेचे मानधन मिळते की नाही. त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्यांकडून रुग्णांना कशा प्रकारे वागणूक मिळते, याची खातरजमा जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यावेळी प्रत्येक सदस्यांना त्यांचा तालुका बदलून तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. रुग्णांना त्यांच्या तक्रारी देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी यांचे मोबाईल नंबर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतींतर्गंत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून दोन धूर फवारणी यंत्र खरेदी करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची तपासणी सक्तीची करण्यात आलेली आहे. पाणी नमुने तपासणीत हयगय करणार्या कर्मचारी आणि ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्या ग्रामपंचायती हागणदारीमुक्तीच्या योजनेत सहभागी होऊन काम करणार नाहीत. त्यांच्या विकास निधीला कात्री लावण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सभेला सदस्या स्वाती कानडे, अश्विनी भालदंड, भास्कर खर्डे, चित्रा बर्डे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे हे सदस्य उपस्थित होते. ■ जिल्ह्यात डेंग्यूची साथ असल्याने सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच ते मुख्यालयात राहतात की नाही, याची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.