‘विकेल ते पिकेल’ योजनेसाठी ई-पीक पाहणीची माहिती उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:13+5:302021-09-13T04:20:13+5:30
संगमनेर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेसाठी ‘ई-पीक पाहणीची माहिती उपयुक्त ठरणार आहे. ...

‘विकेल ते पिकेल’ योजनेसाठी ई-पीक पाहणीची माहिती उपयुक्त
संगमनेर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेसाठी ‘ई-पीक पाहणीची माहिती उपयुक्त ठरणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई व पीकविमा याबाबत येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल, असे संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे म्हणाले.
‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ या संकल्पनेवर आधारित ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प मोहीम राज्यात महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्याबाबत प्रबोधन व प्रसार होण्यासाठी कृषी सेवा केंद्र व सहकारी सोसाट्यांमार्फत गावा-गावात शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यावेळी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी डॉ. मंगरुळे म्हणाले, शासनाच्या विविध योजना राबविण्याकरिता तसेच लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ अनुज्ञेय करण्याकरिता याद्वारे नोंदविण्यात आलेली पीक पाहणी आकडेवारी आधारभूत असणार आहे. या ॲपमुळे होणारी पीकपाहणी अचूक असून त्यात शेतकऱ्यांचा थेट सहभाग असणार आहे. सर्वच शेतकऱ्यांनी शासनाच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पात सहभाग नोंदवून पीकपेऱ्याची नोंद करावी. असे आवाहनदेखील डॉ. मंगरुळे यांनी केले.
---------------
संगमनेर तालुक्यात आतापर्यंत सुमारे ५८ हजार खातेदारांनी आपली नोंदणी ‘ई-पीक पाहणी ॲपवर केलेली आहे. तसेच उर्वरित खातेदारांनी १५ सप्टेंबरपर्यंत पीकपाहणी नोंदविण्याचे कामकाज पूर्ण करावे. ‘ई-पीक पाहणी’च्या कामात अडचण आल्यास शेतकऱ्यांनी तलाठी अथवा मंडलाधिकारी यांना संपर्क करावा.
अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर