संगमनेर : कोरोना संकटात राज्यात बालविवाहाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रशासनाच्या सहकार्याने औरंगाबाद, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात कोरोना काळात आतापर्यंत ७० बालविवाह रोखले आहेत. बालविवाह पूर्णपणे रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंध कायद्यात बदल व्हावा, अशी अपेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने व्यक्त केली जाते आहे.
सन २०१६ ते आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अहमदनगर, औरंगाबाद, जालना, ठाणे, उस्मानाबाद, पुणे, नाशिक आणि बीड या जिल्ह्यात साधारण २३५ बालविवाह रोखल्याची माहिती समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी दिली. कोरोना काळात बालविवाहाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने राज्यातील काही जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू असून, १३५ बालविवाह झाल्याचे त्या माध्यमातून समोर आले आहे. प्रत्यक्षात किती बालविवाह झाले? हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर समोर येईल. माहिती उशिरा मिळाली, अथवा मिळालीच नाही. तसेच काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य मिळाले नसल्याने बालविवाह झाले, असेही ॲड. गवांदे यांनी सांगितले.
कोरोना काळात मुलींचे शिक्षण थांबले. सर्वच गोष्टीत अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे मुलींचे लग्न करून टाका, हीच मानसिकता काही पालकांमध्ये निर्माण झाली आहे. कोरोना काळात सर्वच गोष्टी मर्यादित झाल्या. कोरोनाच्या आधी एखाद्या गावात बालविवाह होणार असल्याची माहिती तत्काळ मिळायची. मात्र, आता विवाह सोहळ्यांसाठी मर्यादा आल्याने अनेकांनी गुपचूप बालविवाह उरकले. असे गुपचूप झालेल्या विवाहांचे प्रमाण खूप मोठे आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा अभाव, कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी, आर्थिक अडचणी यातूनदेखील बालविवाह लावून दिले जात आहेत. असेही निरीक्षण ॲड. गवांदे यांनी नोंदविले आहेत. बालविवाह रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रभावीपणे काम करत आहे. मात्र, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महिला बालकल्याण, सामाजिक न्याय आणि शिक्षण यांनी सतर्कता ठेवून बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे.
--------------
चळवळ उभी करणार
बालविवाह करणे म्हणजे मुलींचे लैंगिक शोषण करण्यासारखे आहे. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी काम होणे गरजेचे आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यात बदल व्हावा, कायदे कठोर व्हावेत. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोठी चळवळ उभी करणार असल्याचे समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी सांगितले.
----------
सर्वेक्षण करणे गरजेचे
शाळा सुरू झाल्यानंतर मुले शाळेत यायला लागतील. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊन मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण कमी झाल्यास मुली शाळेत का येत नाही? याबाबत शिक्षण विभागाने सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. असे झाल्यास ती मुलगी शाळेत न येण्याचे कारण समजून तिचा बालविवाह झाला असल्यास तेहीदेखील समोर येईल.
-------------
अहमदनगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांची संख्या
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा : ३५७३
पहिली ते पाचवी - २,७६,१७०
सहावी ते आठवी - १,८७,७११
एकूण - ४,६३,९६१
------------
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील दोन आणि कौठे कमळेश्वर येथील एक असे एकूण तीन बालविवाह मे महिन्यात रोखले होते. अल्पवयीन मुलींचे आई, वडील अशिक्षित असल्याने त्यांना कायद्याचे ज्ञान नसल्याने त्यांना त्याबाबत कल्पना दिली होती. बाल विवाह करणार नसल्याचे त्यांनी मान्य केल्यानंतर तसे लेखी दिले होते. यापूर्वी संगमनेर तालुक्यात अनेक बालविवाह रोखले आहेत.
- सुरेश शिंदे, गटविकास अधिकारी पंचायत समिती, संगमनेर