कर्तृत्व गाजविणाऱ्या दुर्गा

By Admin | Updated: September 28, 2014 23:27 IST2014-09-28T23:14:34+5:302014-09-28T23:27:09+5:30

अहमदनगर : दुर्गा, कालि, सरस्वती, लक्ष्मी अशी देवीची रुपे आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये सर्वसामान्य महिलांमध्ये पहावयास मिळतात़

Durga Durga Durga | कर्तृत्व गाजविणाऱ्या दुर्गा

कर्तृत्व गाजविणाऱ्या दुर्गा

अहमदनगर : दुर्गा, कालि, सरस्वती, लक्ष्मी अशी देवीची रुपे आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये सर्वसामान्य महिलांमध्ये पहावयास मिळतात़ आपल्या कौशल्याद्वारे त्यांनी आपापल्या क्षेत्रात असमान्य काम केले आहे़ प्रसिद्धीचा कुठलाही हव्यास न बाळगता त्यांचे काम समाजकार्य अविरत सुरु आहे़ धाडसी, स्वावलंबी, नेतृत्वक्षमता त्याग, सेवा, कला-क्रीडा, शिक्षण अर्थ आदी क्षेत्रामध्ये नगर जिल्ह्यातील महिलांनी भरारी घेतली आहे़ त्यातील काही निवडक महिलांचा हा घेतलेला आढावा़़़
प्रयोगशीलतेतून यशस्वीतता
कष्ट करूनही शेतीतून अपेक्षित उत्पादन मिळत नाही़ अशी बहुतांश जणांची ओरड असते़ मात्र, नगर तालुक्यातील निंबळक येथील पुष्पा गायकवाड यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करून किफायतशीर शेती करता येथे हे प्रयोगाअंती सिध्द केले आहे़ निंबळक येथील शेतकरी महिला पुष्पा गायकवाड यांनी त्यांच्या शेतात ज्वारी सुधार प्रकल्पातंर्गत होम प्रकल्प राबविला़ या प्रकल्पातील पंचसूत्रीमुळे ज्वारीचे तीनपट उत्पादन वाढले़ ज्वारीसह कांदा, मूग, हरभरा ही पिकेही आधुनिक पद्धतीचा अवलंब करून घेतल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली आहे़
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड या आपल्या शेतात विविध प्रयोग राबवित आहेत़ त्यांच्या प्रयोगशीलतेचा परिसरातील सुमारे १२५ च्या वर शेतकऱ्यांना लाभ झाला असून, त्यांनीही आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे़ प्रत्येक पिकाचे बीज, त्यांची उत्पादन क्षमता, वाढीसाठी लागणारे पूरक घटक याचा अभ्यास करून नियोजन केले जाते़ पुष्पा गायकवाड यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना हैद्राबाद कृषी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या इक्रिसैट राष्ट्रीय महिला किसान कार्यक्रमात सिल्व्हर मेडल देवून गौरविण्यात आले़
अन्यायग्रस्त महिलांना ‘न्यायाधार’
विविध घटकांकडून अन्याय झालेल्या महिला न्यायासाठी न्यायालयाच्या परिसरात रोज येतात़ यातील अनेक महिला अडाणी व ग्रामीण भागातील असतात़ त्यामुळे न्याय कसा मिळवायचा याचीही कल्पना त्यांना नसते़ या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अ‍ॅड़ निर्मला चौधरी व त्यांच्या सहकारी महिला वकिलांनी महिला वकिलांद्वारे संचलित न्यायाधार संस्थेची स्थापना केली़ ही संस्था अत्याचारग्रस्त महिलांना न्याय देवून त्यांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी प्रेरित करत आहेत़ संस्थेत अ‍ॅड़ चौधरी यांच्यासह ९ महिला वकील कार्यरत असून, १० वर्षात त्यांच्याकडे १ हजार ६५० तक्रारी आल्या होत्या़ यातील ७१५ प्रकरणे सामोपचाराने सोडवित अनेक महिलांना त्यांचा हक्क मिळवून दिला़ अनेकांचे संसार पुन्हा सुरळीत सुरू केले़ कौटुंबिक कलह, अत्याचारग्रस्त, विविध कारणांमुळे पीडित असलेल्या महिला संस्थेकडे येतात़ संस्थेच्या माध्यमातून, त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध माध्यमाद्वारे मदत केली जाते़ नगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातून महिला संस्थेत तक्रारी घेवून येतात़ आलेल्या तक्रारीचा लवकर निपटारा कसा करता येईल, याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते़ संस्थेच्या माध्यमातून कायदापध्दतीत संशोधनाचेही काम सुरू असल्याचे अ‍ॅड़ निर्मला चौधरी यांनी सांगितले़
योग आणि संस्कृती रक्षणासाठी कार्य
शिर्डी-श्री़श्री़रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून श्रीरामपूर येथील रचना फासाटे या समाजात योग जागृती बरोबरच संस्कृती रक्षणासाठी गेल्या सात वर्षांपासून अविरत काम करत आहेत़ महाविद्यालयीन काळापासून फासाटे या अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम करत आहेत़
पुढे २००७ मध्ये त्यांनी योगासनाचे धडे घेतल्यानंतर श्रीरामपूर, राहाता, राहुरी व नेवासा या तालुक्यातील पंचवीस प्रमुख गावात पन्नासहून अधिक शिबिरे घेवून समृध्द आरोग्याबाबत जनजागृती करत आहेत़ आतापर्यंत त्यांनी सुमारे ५० हजार व्यक्तींना आर्ट आॅफ लिव्हींगची कला शिकविली आहे़ विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी श्री़श्री़ रवीशंकर यांच्या पुढाकारातुन सुरू असलेल्या उपक्रमात रचना फासाटे यांनी यवतमाळ तालुक्यातील जोडमोहा या गावात तब्बल अडीच हजार लोकांना आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून त्यांच्यात सकारात्मक विचारसरणी रुजविली़ तसेच त्या गावात तंटामुक्ती व स्वच्छता अभियानही राबविले़ नक्षलवादी परिसरातही त्यांनी शिबिर घेवून थेट नक्षलवाद्यांची संवाद साधून त्यांचे प्रबोधन केले़ आर्ट आॅफ लिव्हींग शिबिराच्या माध्यमातून, आधुनिक शेती, संस्कृतीरक्षण, स्वच्छता, व्यसनमुक्तीसाठी समाजात जनजागृतीचे काम रचना फासाटे करत आहेत़
महिलांना केले
स्वावलंबी
मराठीच्या प्राध्यापिका आणि साहित्यिक प्रा़मेधा काळे यांनी महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी प्रथमच नगर शहरात अंबिका महिला बँकेची स्थापना केली़ आज या बँकेच्या साडेपाच हजार महिला सदस्या आहेत़ समाजात बहुतांश घरात घरातील पुरुष मंडळीच आर्थिक व्यवहार करतात़ क्षमता असूनही महिला मागे राहत गेल्या हे चित्र बदलावे, महिलांनीही व्यावसायिक व्हावे, आणि त्यांना अर्थसाहाय्य देणारी स्वतंत्र बँक असावी, या उद्देशातून काळे आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी बँक स्थापनेचा निर्णय घेतला़ या कामात त्यांना त्यांचे सासरे कै ़ बाळासाहेब काळे यांचे मोठे मार्गदर्शन लाभले़ १९८७ रोजी बँकेला रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळाली़ १९८८ रोजी माळीवाडा येथे बँकेची पहिली शाखा सुरू झाली़ महिलांना स्ववलंबी बनविण्यासाठी बँक विविध व्यवसायांसाठी कर्जवितरण करत आहे़ पापड, कुरडई, मेणबत्ती व्यवसायासाठी तसेच झेरॉक्स मशीन, एक्सरे मशीन, संगणक आदी छोट्यामोठ्या वस्तू घेण्यासाठी महिलांना कर्ज देण्यात येते़ बँकेच्या शहरात चार शाखा कार्यरत आहेत़ प्रत्येक महिलेला सहकार्य केले जात असल्याचे प्रा़ काळे म्हणाल्या़

Web Title: Durga Durga Durga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.