वाढत्या उन्हामुळे शासकीय कार्यालयांत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 23:58 IST2016-05-20T23:48:16+5:302016-05-20T23:58:36+5:30
अहमदनगर : तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उष्णतेमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असून, दुपारच्या रणरणत्या उन्हात रस्ते ओस पडू लागल्याचेही चित्र दिसू लागले आहे.

वाढत्या उन्हामुळे शासकीय कार्यालयांत शुकशुकाट
अहमदनगर : तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उष्णतेमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असून, दुपारच्या रणरणत्या उन्हात रस्ते ओस पडू लागल्याचेही चित्र दिसू लागले आहे. रस्त्यावरील वाहने, नागरिकांची संख्याही रोडावली आहे. शासकीय कार्यालयातील नागरिकांचा वावरही कमी झाला असून जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका या कार्यालयांमध्ये दुपारच्या सुमारास शुकशुकाट दिसत आहे़
जिल्ह्यासह नगर शहरात सध्या ‘मे हिट’चा तडाखा बसत आहे़ सकाळी ९ वाजल्यापासूनच अंगाची काहिली होण्यास सुरुवात होते. त्यामुळेच रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी झाली आहे.
हमरस्त्यावरही वाहने कमी झाल्याचे दिसून येते. रस्त्यांच्या आजूबाजूला असलेली विविध झाडे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव यापूर्वीच तोडण्यात आली असल्याने उन्हाची तीव्रता आणखीच भेडसावते आहे. त्रासदायक उन्हात फिरण्यापेक्षा घरी बसण्यास नागरिक अधिक पसंती देत आहेत.
नगर जिल्ह्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामांनिमित्त जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.
शासकीय कार्यालयांत कामासाठी विलंब असल्यास नागरिक शहरात इतरत्र फिरण्यापेक्षा सावलीचा शोध घेऊन काही वेळ विश्रांती घेत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, बॅँका, तहसील कार्यालयाच्या परिसरातील झाडांखाली दुपारच्या वेळी नागरिक विश्रांती घेताना दिसतात़ मात्र, अनेक झाडांची पानगळती सध्या सुरू आहे. त्यामुळे दाट सावलीही मिळणे कठीण झाले आहे. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसह इतर शासकीय कार्यालयांमध्ये नेहमी आढळून येणारी गर्दी शुक्रवारी दिसत नव्हती़
कार्यालय परिसरात शुकशुकाटच होता. गेल्या काही दिवसांपासून हे चित्र कायम आहे.
(प्रतिनिधी)