मूल होत नसल्याने विवाहितेची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 13:14 IST2018-10-16T13:14:19+5:302018-10-16T13:14:24+5:30
मुलबाळ होत नसल्याने नगर तालुक्यातील बुरूडगाव येथे विवाहितेची तिच्या सासरच्या नातेवाईकांनी हत्या केली असल्याचे समोर आले आहे.

मूल होत नसल्याने विवाहितेची हत्या
अहमदनगर : मुलबाळ होत नसल्याने नगर तालुक्यातील बुरूडगाव येथे विवाहितेची तिच्या सासरच्या नातेवाईकांनी हत्या केली असल्याचे समोर आले आहे. सीमा सचिन म्हस्के (वय ३२) असे मयत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ अदिनाथ फकिरचंद नरवडे (वय २५ रा. पिंपरी घुमरी ता. आष्टी जि. बीड) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी मयत महिलेचा पती सचिन रामदास म्हस्के, सासू हिराबाई रामदास म्हस्के, नणंद अर्चना अमोल जोशी व अमोल जोशी यांच्या विरोधात हुंडाबळी कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सीमा हिचा १६ एप्रिल २०१२ रोजी सचिन म्हस्के याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर सहा महिन्यांनी सीमा हिच्या सासरच्या नातेवाईकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. स्कार्पिओ गाडी घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रूपये आणावेत व मुलबाळ होत नसल्याने पती व सासू तिला वारंवार त्रास देत होते़ ही बाब सीमा हिने तिच्या माहेरी सांगितली होती. रविवारी सीमा हिला जिल्हा रूग्णालयात दाखल केले तेंव्हा तिचे माहेरचे नातेवाईक तेथे आले त्यावेळी सीमा हिचा मृत्यू झाला होता. तिच्या गळ्यावर जखमा व हातावर सूज होती. पैशासाठी व इतर कारणांसाठीच सीमा हिला तिच्या सासरच्या नातेवाईकांनी ठार मारले असल्याचे नरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.