बनावट दारुमुळे एकाचा मृत्यू
By Admin | Updated: March 1, 2017 18:47 IST2017-03-01T18:47:09+5:302017-03-01T18:47:35+5:30
तरवडी येथील एकजण बनावट दारुमुळे मृत्यू पावला असून, एक जणाची प्रकृती अत्यवस्थ आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

बनावट दारुमुळे एकाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
नेवासा (अहमदनगर), दि. 01 - तरवडी येथील एकजण बनावट दारुमुळे मृत्यू पावला असून, एक जणाची प्रकृती अत्यवस्थ आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित दारु विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विक्रेताही दारु पिल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनीही त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
नगर तालुक्यातील पांगरमल येथील दारुकांडानंतर नेवासा येथेही बनावट दारुचा गुन्हा दाखल झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तरवडी येथील बिबनभाई सय्यद यांचा नगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच तरवडीतील नसीर इस्माईल सय्यद (वय ३६) यांना दारु पिल्यामुळे त्रास होऊ लागला. त्यांनी घरी आणून दारुचे सेवन केले होते. मात्र, काही वेळातच त्याची तब्येत बिघडत चालल्याचे पाहून त्याच्या नातेवाईकांनी त्वरीत हालचाल करत उपचारासाठी विळद घाटातील विखे फाउंडेशनच्या रुग्णालयात दाखल केले. ही दारु बनावट असल्यानेच नसीर सय्यद याची प्रकृती बिघडल्याचा आरोप करत कदीर चाँदखाँ पठाण (वय-३६) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात दारुविक्रेत्याविरुद्ध तक्रार नोंदविली आहे.
बनावट दारुचा गुन्हा दाखल होताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी वरिष्ठांना माहिती देऊन घटनेचा तपास सुरु केला. तरवडी गावातील किराणा दुकानातून अवैधरित्या दारु विकणाऱ्याची माहिती पोलिसांना समजताच त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली करण्यात आली़ आपणच ही दारु विकली असून स्वत:ही प्राशन केल्याचे त्याने कबूल केले. विक्रेता स्वत: तिच दारु पिल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यालाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या विक्रेत्याच्या विविध वैद्यकिय चाचण्या करण्यात येत असून दवाखान्यातून अहवाल आल्यानंतरच पुढील निष्कर्ष काढता येतील, असे पोलिसांनी सांगितले़