खडतर प्रवास करत उपजिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 13:02 IST2019-03-05T13:02:02+5:302019-03-05T13:02:10+5:30
वडिलांची लाडाची लेक. ज्या वयात वडिलांनी आणलेल्या खाऊवर पहिला हक्क लाडक्या लेकीचा असायचा. याच नकळत्या वयात वडिलांचे छत्र हरपले.

खडतर प्रवास करत उपजिल्हाधिकारी
शरद शिंदे
वडिलांची लाडाची लेक. ज्या वयात वडिलांनी आणलेल्या खाऊवर पहिला हक्क लाडक्या लेकीचा असायचा. याच नकळत्या वयात वडिलांचे छत्र हरपले. जसे कळायला लागले तसे वडिलांच्या फोटोकडे पाहत आपला शैक्षणिक प्रवास सुरु केला. त्यांनाच प्रेरणास्थानी मानत श्रीगोंद्याच्या माधुरी विठ्ठलराव तिखे या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारी पद मिळविले. या प्रवासात तिला शिक्षिका असलेली आई सुनंदा आणि भाऊ अमोलने मोलाची साथ दिली आहे
पहिलीपासून चौथीपर्यंत जिल्हा परिषदेच्या श्रीगोंदा येथील प्राथमिक शाळेत माधुरीचे शिक्षण झाले आहे. तिच्या यशाने जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले. सहावीपासून दहावीपर्यंत जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेतले. देशपातळीवर घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले. दक्षिणा फाउंडेशनची शैक्षणिक स्कॉलरशीप मिळवत अकरावी- बारावीसाठी बेंगलोर येथील नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला. बारावीमध्ये विषेश प्राविण्य मिळवित आय.आय.टी. च्या गुवाहटी महाविद्यालयात प्रवेश मिळविला. तेथे चार वर्षे शिक्षण घेत संगणक शास्त्रात बी.टेक मिळविली. उत्कृष्ट गुणांनी पदवी उत्तीर्ण झाल्यामुळे कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये सहा आकडी पगाराची नोकरी सहज मिळत असताना, नोकरी करण्याची तयारी होत नव्हती. त्यातच महाविद्यालयीन शिक्षणात भेटलेले सहकारी मित्रांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या उपयोगी पडण्यासाठी प्रशासकीय सेवेचा पर्याय माधुरीला साद घालत होता. आपण घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग तळातील जनतेला होण्यासाठी प्रशासकीय सेवेत करीअर करण्याचा निर्णय पक्का केला. पुढील प्रवास खडतर होता. संपूर्ण भारताचा इतिहास, अर्थशास्त्र, सामाजिक तसेच स्वातंत्र्य चळवळींचा सखोल अभ्यास, विविध नेत्यांचे देश उभारणीतील योगदान, देशासमोरील प्रश्न आणि चालू घडामोडींचा अभ्यास असे मोठे आव्हान तिने पेलले.
स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यातील प्रा. सचिन हिसवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरु केला. गेल्या वेळेस लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तहसीलदारपदी निवड निश्चित केली. या निवडीचे सर्वांनाच कौतुक वाटले आईला तर आनंद गगनात मावेनासा झाला, परंतु, या निवडी आरक्षणाच्या प्रश्नांवर न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्या आणि माधुरीचा प्रशासकीय प्रवेश लांबला. त्यानंतर आयोगाच्या परीक्षेत जोरदार प्रयत्न करत माधुरीने आपल्या यशाचा झेंडा राज्यपातळीवर रोवला. अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारीपदी निवड मिळवित प्रशासकीय सेवेत दमदार प्रवेश मिळविला. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणारांची संख्या कमी नसते, त्यामुळे खडतर प्रवास करून स्वप्न पूर्ण करणारी माधुरी तिखे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरणार आहे. प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी ग्रामीण भागातील मुलींची संख्या वाढण्यासाठी खडतर प्रवास करून स्वप्न साकार करणाऱ्या माधुरी तिखे हिचे यश प्रेरणादायी ठरणार आहे.
वडील खूप प्रेम करायचे. त्यांना प्रेरणास्थानी मानून यश संपादन केले आहे. सर्वसामान्य लोकांची कामे करता यावी म्हणून प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. - माधुरी तिखे