बंधारे फुटल्याने शेतीचे नुकसान
By Admin | Updated: June 24, 2016 01:22 IST2016-06-24T00:45:15+5:302016-06-24T01:22:43+5:30
शेवगाव : शेवगावसह तालुक्यातील बोधेगाव, चापडगाव वगळता तालुक्याच्या बहुसंख्य भागात बुधवारी रात्री दमदार पाऊस झाला.

बंधारे फुटल्याने शेतीचे नुकसान
शेवगाव : शेवगावसह तालुक्यातील बोधेगाव, चापडगाव वगळता तालुक्याच्या बहुसंख्य भागात बुधवारी रात्री दमदार पाऊस झाला. दरम्यान, नानी नदीवरील खरडगाव येथील मोऱ्या कोंडल्यामुळे बंधारे दोन्ही बाजूने फुटल्याने परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले.
गेल्या काही वर्षात जून महिन्यात तालुक्यात पाऊस झाला. गेल्या दोन दिवसापासून तालुक्याच्या बहुतेक भागात पाऊस झाल्याने खरीप पेरण्यासाठी खते व बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. बुधवारच्या पावसामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या ढोरा, नंदीनी नद्यांना चांगले पाणी वाहिले, अनेक बंधारे, ओढे नाल्यांना पाणी आल्याने ग्रामस्थांनी जलपूजन करून जल्लोष केला.
गेल्या चार वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या व यंदाच्या वर्षी १९७२ च्या मोठ्या दुष्काळाच्या संकटापेक्षाही पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाणी टंचाईच्या भीषणतेचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची आस लागली होती. तालुक्यातील ५७ गावे व २३५ वाड्यावस्त्यांना ६८ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता. त्यात जनावरांसाठी ४५ स्वतंत्र खेपा सुरू होत्या. तालुक्यात पावसाला सुरुवात झाल्याने जनावरांच्या ४५ खेपा बुधवारपासून बंद करण्यात आल्या आहेत.