आघाडी सरकारमुळे राज्य २५ वर्ष मागे गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST2021-07-25T04:18:44+5:302021-07-25T04:18:44+5:30
संगमनेर (जि. अहमदनगर) : मंत्री, पालकमंत्री स्वत:च्या मतदारसंघापुरतेच काम करतात. बाकी त्यांना काहीही करायचे नाही. उपमुख्यमंत्री पुण्यात आणि मुख्यमंत्री ...

आघाडी सरकारमुळे राज्य २५ वर्ष मागे गेले
संगमनेर (जि. अहमदनगर) : मंत्री, पालकमंत्री स्वत:च्या मतदारसंघापुरतेच काम करतात. बाकी त्यांना काहीही करायचे नाही. उपमुख्यमंत्री पुण्यात आणि मुख्यमंत्री मुंबईत बसतात. प्रशासनावर सरकारची पकड राहिली नसून महाराष्ट्र २५ वर्ष मागे गेला आहे, अशी टीका माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरात युवकांचे संघटन करण्यात येत आहे. त्यानिमित्त माजी मंत्री बावनकुळे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी (दि. २४) संगमनेरातील पत्रकार परिषदेत माजी मंत्री बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
बावनकुळे म्हणाले, सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षण गेले. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याबाबत महाविकास आघाडी सरकारला काहीही करायचे नाही. सर्व गोष्टी केंद्रावर ढकलून ते मोकळे होतात. ज्यांना जनतेने नाकारले, अशा लोकांनी एकत्र येऊन सरकार बनविले. विधान मंडळाचा राजकीय वापर करत भारतीय जनता पक्षाचे १२ आमदार निलंबित करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, दुबार पेरणीचे संकट असून त्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री काहीही बोलायला तयार नाही. सत्तेत सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांतील मंत्र्यांचे बोलणे हे वेगवेगळे असते. मंत्र्यांनी विकासाबद्दल बोलायला हवे. मात्र, त्यांच्याकडे विकासाचा कुठलाही अजेंडा नाही. पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरात युवकांचे संघटन करण्यात येत असून युवाशक्ती महाराष्ट्रात मोठे परिवर्तन करेल, असे ते म्हणाले.
ज्येष्ठ नेते राम जाजू, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे, उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, संघटन सरचिटणीस योगराजसिंग परदेशी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, सचिव राजेंद्र सांगळे, संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे उपस्थित होते.