जिरायत पट्ट्यात सुकाऴ, मात्र कुकडी लाभक्षेत्रात दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:35+5:302021-01-23T04:21:35+5:30
श्रीगोंदा : गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यात सरासरी पेक्षा जादा पर्जन्यमान झाले. यामुळे यंदा उन्हाळ्यात जिरायत पट्ट्यात पाण्याची परिस्थिती चांगली ...

जिरायत पट्ट्यात सुकाऴ, मात्र कुकडी लाभक्षेत्रात दुष्काळ
श्रीगोंदा : गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यात सरासरी पेक्षा जादा पर्जन्यमान झाले. यामुळे यंदा उन्हाळ्यात जिरायत पट्ट्यात पाण्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र कुकडी लाभक्षेत्रातील विहिरी, बोअर कोरडे पडू लागले आहेत. पिके पाण्याअभावी करपून चालली आहेत. आवर्तन सुटण्यास विलंब होत आहे. त्यामुळे कुकडीचे पाणी पेटणार आहे.
गेल्या वर्षी मेघराज मनमुरादपणे बरसला. जिरायत भागातील कोळगाव, चिखली, कोरेगाव, भानगाव, खांडगाव, उक्कडगाव, सुरेगाव, घुटेवाडी, मांडवगण, कोरेगाव, बांगर्डे, कामठी, ढोरजा, कोथूळ परिसरातील कधी न भरणारे पाझर तलाव तुडुंब भरले. जलशिवार योजनेमुळे पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणावर जिरवले गेले. त्यामुळे भूगर्भातील पातळी पातळीवर उंचावली.
जानेवारी महिन्यात चिखली गावातील बोअर ओसांडून वाहत आहे. भानगावच्या जांभूळ नाला वाहत आहे. तलाव भरलेले आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात जिरायत पट्ट्यात पाण्याची परिस्थिती अतिशय चांगली राहणार यांचे संकेत आहेत. घोड, विसापूर, सीना धरणे भरले आहेत. दोन, तीन आवर्तने शेतीसाठी मिळणार आहेत. ही आवर्तन वेळेवर सोडली गेली पाहिजेत.
मात्र कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकच आवर्तन मिळणार आहे. त्यामुळे एप्रिल, मे, जून ते महिन्यात कुकडी लाभक्षेत्रातील पिकांची राख होणार आहे. त्याची सुरुवात आताच येळपणे, बेलवंडी, पिसोरे, शिरसगाव, चिंभळे, उक्कडगाव शिवारात झाली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पिके वाचविण्यासाठी टँकरने विहिरीत पाणी सोडून हे पाणी पिक व पिण्यासाठी वापरले जात आहे. यंदा कुकडीचा डिंबे, माणिकडोह जोड बोगद्याचे काम झाले असते तर तीन आवर्तने कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मिळाली असती ही वस्तुस्थिती आहे.
....
कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मिळावे यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. एकाही नेत्याने डिंबे, माणिकडोह, जोड, बोगद्याच्या कामाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या कुकडी लाभक्षेत्रातील दुष्काळ हा शासन निर्मित राहणार आहे. यापुढे मंत्री खासदार आमदार यांना कुकडी लाभक्षेत्रातील फिरु दिले नाही पाहिजे.
-भगवान वैद्य, बेलवंडी.
.....
विसापूर लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. विसापूर तलावात तीन आवर्तना पुरेल ऐवढे पाणी शिल्लक असून देखील विसापुरचे पाणी सोडले जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे. विसापुरचे २५ जानेवारीपासून आवर्तन न सोडल्यास बेलवंडी येथील भैरवनाथ मंदिरात उपोषण करणार आहे.
-संजय डाके, तालुकाध्यक्ष, समता परिषद, श्रीगोंदा.