मद्यधुंद पोलिसाचे पिस्तुल चोरीस
By Admin | Updated: January 16, 2016 23:05 IST2016-01-16T23:05:55+5:302016-01-16T23:05:55+5:30
अहमदनगर : कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संजय अंबादास माने यांच्याकडे असलेले एक गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतुसे यांची पुण्यात चोरी झाली.

मद्यधुंद पोलिसाचे पिस्तुल चोरीस
अहमदनगर : कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संजय अंबादास माने यांच्याकडे असलेले एक गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतुसे यांची पुण्यात चोरी झाली. मुंबई येथील प्रयोगशाळेत पिस्तुलाची तपासणी करण्यासाठी जात असताना पुणे रेल्वेस्थानकावर हा प्रकार घडला. या चोरीप्रकरणी पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी दारुच्या नशेत असल्याची माहिती आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी माने हे शुक्रवारी नगर येथून मुंबईकडे निघाले होते. कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतुसे याची मुंबईच्या कलिना येथील प्रयोगशाळेत तपासणी करायची होती. त्यासाठीच माने हे पिस्तुल घेवून मुंबईकडे निघाले होते. माने हे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वेस्थानकावर उतरले. त्यांच्या पिशवीतील पिस्तुल चोरीला गेल्याचे शनिवारी पहाटेच्या सुमारास लक्षात आले. या प्रकरणी पुणे येथील बंड गार्डन पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलीस कर्मचारी माने यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या एका मित्रासमवेत मद्यप्राशन केले. मद्यप्राशन केल्यानंतर पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरातील गुडलक बेकरीसमोरील रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत असताना त्यांचा गावठी कट्टा आणि दोन काडतुसे अज्ञात इसमाने लंपास केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या ताब्यातील पिस्तुल चोरीला गेल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात शनिवारी याच विषयाची दबक्या आवाजात चर्चा होती.
(प्रतिनिधी)