दारू पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाई थंडावली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:39+5:302021-07-05T04:14:39+5:30
अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यभरात पोलिसांना ब्रेथ ॲनालायझर यंत्राचा वापर करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ...

दारू पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाई थंडावली !
अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यभरात पोलिसांना ब्रेथ ॲनालायझर यंत्राचा वापर करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मद्यपी वाहनचालकांवरील कारवाई थंडावली आहे. यावर वैद्यकीय तपासणीचा मार्ग असला तरी तुलनेत कारवाईचे प्रमाण घटल्याने अनेक जण तर्राट होऊन वाहने चालविताना दिसतात.
दारू पिऊन वाहन चालविल्याने बहुतांश वेळा अपघात घडतात. अशा मद्यपी चालकांना शोधण्यासाठी ब्रेथ ॲनालायझर या यंत्राचा चांगला उपयोग होतो. या यंत्राच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक मद्यपींवर कारवाई करणे सोयीचे होते. मात्र हे यंत्र तोंडात घालून तपासणी केली जाते. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने या यंत्राचा मागील दीड वर्षांपासून वाहतूक शाखेकडून वापर बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर पोलिसांनी एखादा मद्यपी वाहन चालक पकडला तर त्याची शासकीय रुग्णालयात नेऊन तपासणी करावी लागते. ही वेळखाऊ प्रक्रिया असते. या अडचणीमुळे कोरोना काळात मद्यपी वाहन चालकांवर कारवाईचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे. २०२० या वर्षात जिल्ह्यात १ हजार ३५८ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र यातील सत्तर टक्के कारवाई या पहिल्या तीन महिन्यात झालेल्या आहेत. कोराेनामुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद असल्याने पोलिसांचीही अडचण झाली आहे.
--------------------------
मास्कमुळे मद्यपी लक्षात येत नाहीत
कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. ब्रेथ ॲनालायझरचा वापरही बंद आहे. त्यामुळे मद्य प्राशन केलेला वाहनचालक सहजासहजी निदर्शनास येत नाही. त्यामुळे कारवाईचे प्रमाण घडले आहे. एखाद्या मद्यपी चालकाला पकडल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात नेऊन तपासणी केली जाते. त्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करून न्यायालयात पाठविले जाते. न्यायालयातून त्याच्यावर दंडात्मक कारवाई होते.
------------------------
कोरोनामुळे ब्रेथ ॲनालायझर वापरास बंदी असल्याने मागील तुलनेत कारवाईचे प्रमाण घटले आहे. नाकाबंदी दरम्यान मद्यपी वाहन चालकांची रुग्णालयात तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहन चालकांनी दारू पिऊन वाहन चालवू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
- विकास देवरे, नगर शहर वाहतूक निरीक्षक
--------------
कोरोनाकाळातही अपघात वाढले
मागील दीड वर्षांत जिल्ह्यात विविध ठिकाणी १ हजार ८१९ अपघात झाले. यात ९१४ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८३८ जण जखमी झाले आहेत. यातील बहुतांशी अपघात हे मद्यपी वाहनचालकांच्या चुकीमुळे झाले आहेत.