अहमदनगर : दुष्काळामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे नगर शहरात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे़ शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागल्याने हे पाणी गटारीत वाहून जात आहे़ वाशिंग सेंटरवर तर दुचाकी व चारचाकी वाहने धुण्यासाठी वीजपंपाचा वापर करून फुकटात वारेमाप पाण्याचा उपसा सुरू आहे़ महापालिका प्रशासनाने मात्र, पाईपलाईनमधून आणि वॉशिंगसेंटरमधून निघणाऱ्या या पाण्याच्या फवाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे़ शहरात विविध भागात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली असून हे पाणी गटारीतून वाहत असल्याचे बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून निदर्शनास आले़ मुख्य रस्त्यासह अंतर्गत ठिकाणीही पाणीगळती सुरूच आहे़ या पाणीगळतीसह दुचाकी व चारचाकी वाहनांना सर्व्हिस देणाऱ्या वॉशिंग सेंटरवर मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे़ शहरासह उपनगरात २०० पेक्षा जास्त वॉशिंग सेंटर आहेत़ वाहनांच्या वॉशिंगसाठी बोअरवेल घेऊन त्या पाण्याचा उपसा केला जातो़ वीजपंप लावून वाहनांवर वेगाने पाण्याचा फवारा मारला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे़ व्यावसायिक कारणासाठी बोअरवेल घ्यावयाचा असेल तर प्रांताधिकारी व भूजल विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते़ शहरातील एकाही वॉशिंग सेंटरचालकाने अशी परवानगी घेतली नसल्याचेही समोर आले आहे़ अनेक व्यावसायिक सकाळी व सायंकाळीच्या सुमारास रस्त्यावर पाणी मारतात. यातूनही पाण्याचा मोठा अपव्यय होतो. दुष्काळामुळे पाणीपातळी खालावली असताना वाहनांना वॉशिंग करण्यासाठी होणारा पाण्याचा उपसा थांबविणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) वैयक्तिक व किंवा व्यावसायिक करणासाठी ६० फूटपेक्षा जास्त बोअरवेल घ्यावयाचा असेल तर प्रांताधिकारी यांच्यामार्फत भूजल विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते़ याबाबत जून २०१४ पासून कायदा झालेला आहे़ भूजलविभागाकडे मात्र, २०१४ पासून बोअरवेलसाठी कुणीही परवानगी मागीतलेली नाही़ या संदर्भात काय कारवाई करावयाची याची नियमावली शासनाकडून अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नाही़ -ऋषीराज गोस्की, वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी महापालिका हद्दीत पाईपलाईन गळती असेल तर तातडीने दुरुस्तीचे काम केले जाते़ नागरिकांची तक्रार येताच कर्मचारी दखल घेऊन काम करतात़ दुष्काळ असल्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर केला जात आहे़ नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा. -महादेव काकडे, प्रभाग अभियंता, मनपा नगर शहरात औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह परिसर, वसंत टेकडी, मनमाड रोडवरील बोल्हेगाव पूल, निंबळक बायपास, तपोवन रोड, सावेडी नाका, पत्रकार चौक, एमआयडीसी परिसर, भिंगार परिसर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागल्याने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे़ तक्रार करूनही दुर्लक्ष : शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या पाणीगळतीची स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत़ अधिकारी मात्र, दुर्लक्ष करत असल्याने हे पाणी गटारीत वाहून जाते़ वसंत टेकडी येथील स्टेशनवरून नगर तालुक्यासाठी ११ तर शहरासाठी दररोज १० टँकरने पाणीपुरवठा केला जातो़ मुळा धरणाची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांवर पाणीकपातीचे संकट आहे़ सध्या शहरात बहुतांश ठिकाणी तीन ते चार दिवसांतून एकदाच पाणी सोडले जाते़ कल्याण रोड, सारसनगर, केडगाव व बोल्हेगाव परिसरातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ महापालिकेचे टँकरही वेळेवर येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे़ नगर शहरात ३०० पेक्षा जास्त वॉशिंग सेंटर आहे़ ६० फूट पेक्षा जास्त खोल बोअरवेल घ्यावयाचा असेल तर भूजलविभागाची परवानगी घेणे आवश्यक ठरते़ तसेच महापालिकेकडेही व्यवसायाची नोंद करावी लागते़ शहरातील एकाही वॉशिंग सेंटर चालकाने बोअरवेलची परवानगी न घेताच मोठ्या प्रमाणात पाणीउपसा करून व्यवसाय करत आहेत़
दुष्काळात पाण्याचे फवारे
By admin | Updated: March 16, 2016 23:58 IST