शेतीत येणार आता ड्रोन टेक्नॉलॉजी; शेतक-यांना मिळणार अचूक माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 12:06 IST2020-05-03T12:06:03+5:302020-05-03T12:06:51+5:30
येत्या काही वर्षात शेतीतील ड्रोनचा वापर वाढला जाईल. त्यातून शेतक-यांना पिकांचा सर्व्हे, पीक नुकसानीची अचूक माहिती शेतक-यांना मिळविता येणार आहे, असे मत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वेंकट मायंदे यांनी मांडले.

शेतीत येणार आता ड्रोन टेक्नॉलॉजी; शेतक-यांना मिळणार अचूक माहिती
राहुरी : भारतातील ड्रोन कंपन्यांना कमी खर्चात ड्रोनची निर्मिती करून ते शेतक-यांपर्यंत पोहोच करणे आवश्यक आहे़. येत्या काही वर्षात शेतीतील ड्रोनचा वापर वाढला जाईल. त्यातून शेतक-यांना पिकांचा सर्व्हे, पीक नुकसानीची अचूक माहिती शेतक-यांना मिळविता येणार आहे, असे मत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वेंकट मायंदे यांनी मांडले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कास्ट-कासम या प्रकल्पाच्या वतीने काटेकोर शेतीसाठी ड्रोन टेक्नॉलॉजीची मूलतत्त्वे या विषयावर आयोजित आॅनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचा शनिवारी समारोप झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वेंकट मायंदे बोलत होते.
भारतातून तसेच विदेशातून ७०० प्रशिक्षणार्थींनी आॅनलाईन प्रशिक्षण घेतले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा होते. यावेळी संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, प्रकल्प समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार तसेच सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे स्वानंद गुधाटे, अजित खर्जुल, शशांका मालगामा, डॉ. सचिन नलावडे आदी आॅनलाईन उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले, लॉकडाऊनमुळे प्रत्येक क्षेत्रात अमूलाग्र बदल होणार आहेत. शेतीतील यांत्रिकीकरण वाढणार आहे़ त्याचवेळी शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरही वाढणार आहे. तसेच ड्रोनच्या साहाय्याने विविध आपत्तीमध्ये होणारे पीक नुकसानीचे मूल्यमापन अचूकपणे करून इन्शुरन्सचा फायदा शेतक-यांना करून देता येऊ शकतो, याकडे लक्ष दिले पाहिजे.
प्रास्ताविक डॉ. सुनील गोरटीवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गिरीशकुमार भणगे यांनी केले. आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले.