कोपरगाव : झगडे फाट्याहून कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या पिकअपला (एमएच १५ ईजी ६७५१) पुणतांबा फाट्याहून झगडे फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरने (एमएच ०४ एच ३४४४) समोरून जोराची धडक दिली. या धडकेत पिकअप व डंपर हे दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. यात डंपरवरील चालक व्यंकट कृष्णा काकळीज (५३, रा. वाखारी, ता. नांदगाव, जि. नाशिक) हा जागीच ठार झाला आहे, तर पिकअपमधील मोहम्मद हामिद हासीम अन्सारी (३९) व इरफान उस्मान अन्सारी (दोघे रा. येवला, जि. नाशिक) या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
हा अपघात बुधवारी (दि.२१) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाटा ते झगडे फाटा रस्त्यावर डाऊच शिवारात झाला आहे. याप्रकरणी पिकअप चालक मोहम्मद हामिद हासीम अन्सारी यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.२२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे करीत आहेत.