भंडारादरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ औरंगाबादच्या पर्यटकाचा पाय घसरून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 16:26 IST2018-08-16T16:26:24+5:302018-08-16T16:26:29+5:30
भंडारदरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ जात असताना पाय घसरुन वरून खाली पडल्याने औरंगाबाद येथील सुभाष हरिभाऊ नलावडे (४५) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारनंतर घडली.

भंडारादरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ औरंगाबादच्या पर्यटकाचा पाय घसरून मृत्यू
राजूर : भंडारदरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ जात असताना पाय घसरुन वरून खाली पडल्याने औरंगाबाद येथील सुभाष हरिभाऊ नलावडे (४५) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारनंतर घडली.
या बाबत येथील पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मयत सुभाष नलावडे (रा. गल्ली नंबर २, कैलास नगर, औरंगाबाद) हे आपली आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय, भाचा यांच्या समवेत भंडारदरा येथे पर्यटनासाठी आले होते. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने आज भंडारदरा परिसरात पर्यटकांच्या गदीर्ला उधाण आले होते. भंडारदरा धरणाच्या अँब्रेला फॉलमधून गेल्या दोन दिवसांपासून पाणी सोडण्यात येत आहे. हा फॉल पाहण्यासाठी हे कुटुंब तेथे आले होते. मयत नलावडे हे अँब्रेला फॉलच्या जवळ आले. येथे असलेल्या मोरीतून वेगाने पाणी बाहेर येत असते, या ठिकाणी त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले. खाली पडताच प्रवाहा बरोबर फॉलच्या खाली पडले. यात त्यांच्या डोक्यास मार लागल्याने ते जागीच मृत्यू पावले. घटनेची माहिती समजताच पोलीस कर्मचारी किशोर तळपे, प्रवीण थोरात घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी सांगितली. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.