पोलीस बंदोबस्तात पिण्यासाठी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 23:13 IST2016-04-16T22:57:26+5:302016-04-16T23:13:08+5:30

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता पोलीस बंदोबस्तात ५०० क्यूसेकने आवर्तन सोडण्यात आले़आवर्तन कालावधीत चार तालुक्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे.

Drinking water for the police constable | पोलीस बंदोबस्तात पिण्यासाठी पाणी

पोलीस बंदोबस्तात पिण्यासाठी पाणी

कुकडीचे आवर्तन सुटले : चार तालुक्यात जमावबंदी आदेश
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता पोलीस बंदोबस्तात ५०० क्यूसेकने आवर्तन सोडण्यात आले़आवर्तन कालावधीत चार तालुक्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल जगताप, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांनी शनिवारी विसापूर, मोहरवाडी, पारगाव तलावांची पाहणी केली व प्रशासकीय यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कुकडी प्रकल्पात अतिशय कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणावर जिरणार असल्याने श्रीगोंद्यातील विसापूर, मोहरवाडी, भावडी, घोडेगाव, पारगाव सुद्रिक, लेंडीनाला, वेळू या सात तलावात पाणी सोडण्यासाठी येडगाव धरणातून पाणी सोडण्यात आले़
वेळू तलावात कुकडीचे आवर्तन सोडावे, यासाठी नगरसेवक मनोहर पोटे, बापू गोरे, सतीश मखरे, एम. डी. शिंदे, नाना कोंथिबिरे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी १३२ जोड कालव्यावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. घोड धरणावरून केलेली नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी विलंब का लावला? अशी विचारणा करुन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सुनावले. श्रीगोंदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न विचारात घेऊन सात व्यतिरिक्त अन्य तलावात पाणी सोडावे, अशी मागणी आमदार राहुल जगताप यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे केली. आम्ही १८ एप्रिलला घारगाव येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा जगताप यांनी दिला.
कुकडी आवर्तन सुटल्यानंतर पाणी नियोजनात अडथळा येऊ नये, काही जण जमाव आणून कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा धोका आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कवडे यांनी कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड या तालुक्यात १६ एप्रिलपासून ५ मे पर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. याकाळात आंदोलनही करता येणार नाही. आंदोलन झाल्यास आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
राज्य राखीव दल तैनात
कुकडीचे आवर्तन शांततेत होण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात केली आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना पाचारण केले आहे. कुकडी आवर्तनाचा पाणीसाठा दोन महिने टिकण्यासाठी २४ पोलीस, महसूल, पंचायत समिती, जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांचा चोवीस तास पहारा राहणार आहे. कुकडी कालवा पाचशे मीटर परिसरातील बोअर, विहिरी अधिग्रहित करणार आहेत.
पाण्यासाठी दागिने गहाण
शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी स्वखर्चाने पुरविण्यासाठी टँकरला आगाऊ रक्कम देण्यासाठी भाजपा नगरसेविका संगिता मखरे यांनी दागिने गहाण ठेवले आहेत. बापू गोरे, सुनील वाळके, नाना कोंथिबीरे, एम.डी. शिंदे, अर्चना गोरे गयाबाई सुपेकर, मनोहर पोटे यांनीही स्वखर्चाने पिण्याचे टँकर सुरू केले आहेत. उपनगराध्यक्ष अख्तार शेख यांचा बारमाही टँकर सुरू आहे.
केटीवेअरचा अडथळा
घोडेगाव तलावात १५ एम़सी़एफ़ टी़ पाणी सोडण्याचा निर्णय झाला़ मात्र घोडेगाव तलावाच्या वर सात केटीवेअर आहेत़या केटीवेअरचा पाणी सोडण्यात अडथळा निर्माण झाल्यास तलावात पाणी न सोडण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Drinking water for the police constable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.