सरकारची दारू प्या.. तर आमचा चखना खा..! नगरमध्ये अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:09 IST2020-05-09T12:08:35+5:302020-05-09T12:09:41+5:30
शासनाने दारू विक्रीला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ येथील जागरूक नागरिक मंचाच्यावतीने शुक्रवारी (दि.८) शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले. दारू खरेदीसाठी दुकानांसमोर रांगेत उभे असलेल्या मद्यप्रेमींना आंदोलकांनी चखण्याच्या पुड्या वाटून सरकारी निर्णयाचा अभिनव पद्धतीने निषेध नोंदविला. हे आंदोलन चांगलाच चर्चेचा विषय ठरले.

सरकारची दारू प्या.. तर आमचा चखना खा..! नगरमध्ये अनोखे आंदोलन
अहमदनगर : शासनाने दारू विक्रीला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ येथील जागरूक नागरिक मंचाच्यावतीने शुक्रवारी (दि.८) शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले. दारू खरेदीसाठी दुकानांसमोर रांगेत उभे असलेल्या मद्यप्रेमींना आंदोलकांनी चखण्याच्या पुड्या वाटून सरकारी निर्णयाचा अभिनव पद्धतीने निषेध नोंदविला. हे आंदोलन चांगलाच चर्चेचा विषय ठरले.
मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या पुढाकारातून हे आंदोलन करण्यात आले. मुळे म्हणाले, गेल्या ४५ ते ५० दिवसांपासून सर्वसामान्य गोरगरीब जनता लॉकडाऊनमुळे घरात बसून काटेकोरपणे सर्व नियमांचे पालन करत आहे. अशा परिस्थितीत सरकारने दारुची दुकाने सुरु करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. दारू जर जीवनावश्यक वस्तू आहे तर दारू घेणा-यांसाठी चखनाही महत्वाचा आहे. म्हणून जागरूक नागरिक मंचच्यावतीने राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पोषक आहार म्हणून कोरोना स्पेशल चखण्याची पाकिटे दारू घेण्यासाठी रांगेत उभे असलेल्या नागरिकांना देऊन आंदोलन केले आहे. जो पर्यंत राज्य सरकार हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू असणार असल्याचे मुळे यांनी सांगितले.
या आंदोलनात जागरूक नागरिक मंचचे कैलास दळवी, भैरवनाथ खंडागळे, योगेश गणगले, हरिभाऊ डोळसे, सुनील कुलकर्णी, राजू पडोळे, बी. यु़ कुलकर्णी, अमेय मुळे आदी सहभागी झाले होते.