एबीफॉर्मसाठी अंतिम क्षणापर्यंत ओढाताण

By Admin | Updated: September 27, 2014 23:08 IST2014-09-27T23:07:07+5:302014-09-27T23:08:45+5:30

अहमदनगर : विधान सभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता़

Drift to the last minute for ABForm | एबीफॉर्मसाठी अंतिम क्षणापर्यंत ओढाताण

एबीफॉर्मसाठी अंतिम क्षणापर्यंत ओढाताण

अहमदनगर : विधान सभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता़ भाजपाकडून उमेदवारीचे आश्वासन मिळालेल्या इच्छुकांच्या हातात मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पक्षाचा एबीफॉर्म न मिळाल्याने शेवटच्या काही तासात अनेकांना अक्षरक्ष: जीवाचा आटापिटा करावा लागला़ कसाबसा एबीफॉर्म हातात पडल्यानंतर इच्छुकांची घालमेल संपली. अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्याआधी मतदानकेंद्रावर पोहोचलेल्या इच्छुकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला़ दरम्यान, भाजपाकडून सात दलबदलूना उमदेवारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेल्या मोदी लाटेचा प्रभाव विधानसभा निवडणुकीतही कायम राहील हा अंदाज बांधून जिल्ह्यातील बहुतांश इच्छुकांनी भाजपाच्या उमेदवारीसाठी दोन ते तीन महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधले होते़ कोपरगाव, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, नगर शहर, पारनेर, शिर्डी व पाथर्डी- शेवगाव मतदारसंघातील अनेकांनी पक्षद्रोह करत भाजपा पक्षश्रेष्ठींचे उंबरे झिजविले़ यातील बहुतांश जणांना उमेदवारीचे आश्वासन मिळाले़
विशेष म्हणजे एकाच मतदारसंघातील दोन ते तीन जणांना भाजप श्रेष्ठींनी उमेदवारीचे आश्वासन दिले होते़ त्यामुळे उमेदवारी आपल्यालाच मिळणार या अविर्भावात प्रत्येक जण होता़ राज्यात सेना-भाजपातील युती संपुष्टात आल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात भाजपाकडून इच्छुक असलेल्यांच्या आशा पल्लवित झाल्या़ उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस एक दिवसांवर येवूनही पक्षाचा अधिकृत एबीफॉर्मच न मिळाल्याने या इच्छुकांची चांगलीच घालमेल वाढली़ अकोले, पारनेर, पाथर्डी-शेवगाव, नेवासा, अकोले, कोपरगाव आणि श्रीगोंद्यातून अन्य पक्षातून आलेल्यांना भापजाने संधी दिली आहे.
(प्रतिनिधी)
अखेर राजळेंना उमेदवारी
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपाकडून शिवाजीराव काकडे हे प्रमुख दावेदार होते़ दोन दिवसांपासून काकडे एबीफॉर्मसाठी मुंबईत तळ ठोकून होते़ शुक्रवारी रात्री काकडेंनाच फॉर्म मिळाल्याचे मतदारसंघात सांगण्यात आले़ काकडेंच्या कार्यकर्त्यांनी फटाकेही फोडले़ प्रत्यक्षात मात्र, राजीव राजळे हे पत्नी मोनिका राजळेंसाठी भाजपाची उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाले़ दुपारी पावणे तीनच्या सुमारास राजळे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल.
नेवासा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीसाठी साहेबराव घाडगे, बाळासाहेब मुरकुटे, भानुदास मुरकुटे आणि अजित फाटके इच्छुक होते़ शेवटच्या टप्यात घाडगेंना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली़ तर फाटकेंचा पत्ताही आधीच कट झाला होता़ स्पर्धेत होते ते बाळासाहेब मुरकुटे आणि भानुदास मुरकुटे़ शेवटी बाळासाहेब मुरकुटेंना शुक्रवारी रात्री उशिरा फॉर्म मिळाला़
पारनेर मतदारसंघातून भाजपाकडून माजी सभापती बाबासाहेब तांबे, माधवराव लामखडे आणि विश्वनाथ कोरडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीविरोधात दंड थोपटलेल्या लामखडेंनी भाजपाच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले़ मात्र तांबेंच्या पदरात शनिवारी सकाळी एबीफॉर्म मिळाला़
राज्यात भाजपा व स्वाभिमानी पक्ष यांच्यात आघाडी झाल्याने श्रीरामपूर मतदारसंघ स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात आला होता़ स्वाभिमानीने प्रभाकर कांबळे यांची उमेदवारी निश्चित केली होती़ भाऊसाहेब वाकचौरेंनी मात्र, अचानक पक्षाची उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले़
नगर शहरातही भाजपाची उमेदवारी कुणाला द्यावयाची याची शुक्रवारी दिवसभर चर्चा सुरू होती़ शहरातील नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू होत्या़ अनेक नावे पुढे येत होती़ शेवटी अभय आगरकरांना एबीफॉर्म देण्यात आला़ शिर्डीमधून राजेंद्र पिपाडा व राजेंद्र गोंदकर भाजपाकडून इच्छुक होते़ हे दोघेही मुंबईत दोन दिवस बसून होते़ श्रेष्ठींनी शेवटी पिपाडा यांना एबीफॉर्म दिला़ मात्र, वाटेत त्यांचे वाहन आडवून तो फॉर्म पळविण्यात आला़ त्यामुळे वातावरण चांगलेच तणावपूर्ण
बनले होते़

Web Title: Drift to the last minute for ABForm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.