अहमदनगर : जिल्ह्यातील ज्वारीच्या पेऱ्यात यंदा कमालीची घट झाली आहे. सरासरीच्या (उद्दिष्ट) अवघ्या ४५ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली. जिल्ह्यात रबी हंगामाचीही एकूण केवळ ४७ टक्केच पेरणी झाली असून हरभऱ्यालाही यंदा शेतकऱ्यांनी नापसंती दर्शविली आहे.
यंदा पाऊस लांबल्याने रबी हंगामाची सुरुवातही उशिराने झाली. त्यामुळे ज्वारी, गहू पेरणीही उशिरा झाली. हंगाम लांबल्याने ज्वारी पेरणीत घट झाली. कृषी विभागाचे ४ लाख ७७ हजार १८ हेक्टरवर ज्वारी पेरणीचे सरासरी उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख १४ हजार २०८ हेक्टरवर (४५ टक्के) पेरणी झाली आहे. उगवलेल्या ज्वारीवरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादन घटण्याचीही शक्यता आहे.
गव्हाची जिल्ह्यातील ५९ हजार ५३३ हेक्टवर पेरणी झाली आहे. ही पेरणी सरासरीच्या ४५ टक्के आहे. त्यापाठोपाठ रबीतील महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्याच्या पेऱ्यातही लक्षणीय घट झाली आहे. १ लाख ५३ हजार ६२७ पैकी ६५ हजार ८१७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. ही सरासरी अवघी ४३ टक्के आहे. करडई, तीळ, जवस, सूर्यफूल आदी पिके जिल्ह्यात केवळ नावालाच असल्यासारखी स्थिती आहे. या पिकांची नगण्य पेरणी झाली आहे. ७ लाख २६ हजार २९२ हेक्टर क्षेत्रावर जिल्ह्यातील रबी हंगामाच्या पेरणीचे कृषी विभागाने नियोजन केले होते. मात्र, त्यापैकी अवघ्या ३ लाख ४२ हजार १५२ हेक्टवरच विविध पिकांची पेरणी झाली आहे.
चौकट...
कर्जत, पाथर्डीत हरभरा अधिक..
कर्जत, पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला प्राधान्य दिले आहे. कर्जत तालुक्यात ११ हजार ३८९ हेक्टरवर तर पाथर्डी तालुक्यात १० हजार हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे.
चौकट...
पारनेरमध्ये सर्वाधिक कांदा लागवड..
जिल्ह्यात ८४ हजार ४६७ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. त्यात पारनेर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे २२ हजार ७६६ हेक्टरवर कांदा लागवड झाली. त्यापाठोपाठ श्रीगोेंदा, नगर तालुक्यात कांदा लागवड झालेली आहे.