वृक्ष संवर्धनासाठी डॉक्टर सरसावले
By Admin | Updated: September 22, 2015 00:22 IST2015-09-22T00:15:36+5:302015-09-22T00:22:51+5:30
अहमदनगर : उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी जाताना रूग्णाला एक रोपटेही भेट देण्याचा उपक्रम सावेडी येथील नोबल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आला आहे.

वृक्ष संवर्धनासाठी डॉक्टर सरसावले
अहमदनगर : उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी जाताना रूग्णाला एक रोपटेही भेट देण्याचा उपक्रम सावेडी येथील नोबल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आला आहे. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनीच या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. माणसाचे जीवन अधिक सुखमय आणि आरोग्यसंपन्न व्हायचे असेल तर किमान एक झाड जगविणे काळाची गरज असल्याचा संदेश यानिमित्ताने दिला आहे.
नोबल हॉस्पिटलमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानिमित्त डॉ. कांडेकर यांनी रुग्णांना घरी जाताना एक रोपटे भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या ‘वृक्ष माझा सखा’ या उपक्रमाबाबत डॉ. कांडेकर म्हणाले, औषधोपचारानंतर बरे होऊन घरी जाताना रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. तसाच आनंद रुग्णांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून समाजाला द्यावा. एका झाडाची एका रुग्णाने जबाबदारी घेणे अपेक्षित आहे. दिलेले रोप घराच्या अंगणात, कॉलनीत, रस्त्याच्या कडेला यापैकी कुठेही लावावे. मात्र ते रोपटे वाढविण्याची जबाबदारी रुग्णाने घेणे आवश्यक आहे. पुढच्या वेळी रुग्णाकडून रोपट्याची माहिती घेतली जाणार आहे. रोपटे लावण्याच्या या उपक्रमात हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी सहभागी असतील.
या उपक्रमाचा प्रारंभ शनिवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कवडे म्हणाले, जिल्ह्यात ३३ टक्के वनीकरण आवश्यक असताना केवळ ८ टक्केच वनीकरण झाले आहे. झाडांची संख्या कमी आहे. त्यामुळे माणसाचे जीवन धोक्यात आले आहे. हे सर्व टाळायचे असेल तर झाडे लावण्याबाबत जागृती करण्याची गरज आहे.
या कार्यक्रमास एल अॅण्ड टीचे अरविंद पारगावकर, डॉ. सुंदर गोरे, डॉ. प्रताप पटारे, डॉ. विजय पाटील, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ. दिलीप पवार, राहुल हिरे, विनय पिंपरकर, डॉ.राकेश गांधी आदी उपस्थित होते. नोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय निकम यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)