डॉ. तारा भवाळकर यांना जीवनगौरव तर दिनकर मनवर यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:26 IST2021-08-19T04:26:09+5:302021-08-19T04:26:09+5:30
अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार अशोक लिंबेकर (संगमनेर) यांच्या ‘वय कोवळे उन्हाचे’ या ललित लेखसंग्रहास, अहमदनगर जिल्हा ...

डॉ. तारा भवाळकर यांना जीवनगौरव तर दिनकर मनवर यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार अशोक लिंबेकर (संगमनेर) यांच्या ‘वय कोवळे उन्हाचे’ या ललित लेखसंग्रहास, अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार डॉ. सोमनाथ मुटकुळे (संगमनेर) यांच्या ‘पुन्हा क्रांतिज्योती’ व अशोक महाराज निर्मळ (राहाता) यांच्या ‘एक वेडा नर्मदेकाठी’ या पुस्तकास देण्यात येणार आहे.
पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या जयंती समारंभात साहित्य पुरस्कार देण्याचे हे ३१ वे वर्ष आहे. पद्मश्री डॉ. विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार पुणे येथील धर्मकीर्ती सुमंत यांना तर समाजप्रबोधन पुरस्कार साधनाचे संपादक पाथर्डी येथील विनोद शिरसाठ यांना देण्यात येणार आहे. पद्मश्री डॉ. विखे पाटील कलागौरव पुरस्कार मुंबई येथील गणेश चंदनशिवे यांना देण्यात येणार आहे.
लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक-समीक्षक डॉ. तारा भवाळकर या लोकसाहित्याचा मूलगामी शोध घेणाऱ्या व लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणाऱ्या मीमांसक म्हणून ओळखल्या जातात. लोकसाहित्याचे संशोधन करताना ते त्यांनी स्त्री जाणिवेतून केले. त्यामुळे परंपरागत अशी जी स्त्रीची प्रतिमा समाजात रूढ झाली होती, त्यामागील पुरुषी दृष्टिकोन त्यांनी अभ्यासांती विशद केलेले आहे. दिनकर मनवर हे वेगळ्या आशयद्रव्याने युक्त कविता लिहिणारे कवी आहेत. सुरेश पाटील यांची ‘पाणजंजाळ’ ही कादंबरीही निसर्गातील जलतत्त्वाशी निगडित आहे. विनोद शिरसाठ २००४ पासून ते साधना साप्ताहिकामध्ये स्तंभलेखक, अतिथी संपादक, संपादक अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. धर्मकीर्ती सुमंत यांचे लेखन चित्रपट आणि नाटकांमधून प्रवाहीपणा आणि उपहासात्मक विनोद या दोहोंचा मेळ घालत पुरोगामी शैलीत अभिव्यक्त होते. गणेश चंदनशिवे हे आजच्या पिढीतील तरुण कलावंत आहेत. अशोक लिंबेकर यांच्या ‘वय कोवळे उन्हाचे’ यातील ललित लेख तरल भावना-संवेदनांचा प्रत्यय देणारे आहेत. अशोक महाराज निर्मळ यांच्या ‘एक वेडा नर्मदेकाठी’ या नर्मदा परिक्रमा केलेल्या प्रवासवर्णनास व डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्या हस्ते ‘पुन्हा क्रांतिज्योती’ या एकपात्री नाटकास जिल्हा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. निवड समितीमध्ये डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. एकनाथ पगार, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे व डॉ. राजेंद्र सलालकर यांनी काम पाहिले.