चार वाजता दार बंद, आतून ‘दे दारू’ सुरूच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:50+5:302021-07-20T04:16:50+5:30
अहमदनगर: कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने प्रशासनाने दुपारी चार वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर व्यवसाय व व्यवहारांना बंदी घेतलेली आहे. ...

चार वाजता दार बंद, आतून ‘दे दारू’ सुरूच !
अहमदनगर: कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने प्रशासनाने दुपारी चार वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर व्यवसाय व व्यवहारांना बंदी घेतलेली आहे. दारू विक्रीचा परवाना असलेल्या हॉटेल चालकांकडून मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. नगर शहर व परिसरातील बहुतांशी हॉटेल चालक सायंकाळी चार वाजता दार बंद करतात. आतमध्ये मात्र सर्रास पार्ट्या रंगलेल्या दिसतात.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने दक्षता म्हणून प्रशासनाने निर्बंध कडक लागू केले आहेत. शनिवार व रविवार पूर्णत: विकेंड लॉकडाऊन आहे. इतरवेळीही हॉटेलमध्ये ग्राहकांची ५० टक्केच उपस्थिती ठेवण्याचा नियम आहे. दारू विक्री करणाऱ्या काही हाॅटेलमध्ये मात्र दिवसासह रात्रीही गर्दी पाहावयास मिळत आहे. विशेष करून, महामार्गावरील हॉटेल चालकांकडे उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे काही हॉटेल लॉकडाऊनमध्येही हाउसफुल झाल्याचे दिसत आहेत. नगर-पुणे महामार्ग, नगर-औरंगाबाद, नगर-कल्याण, नगर-दौंड व नगर-मनमाड या महामार्गावरील हॉटेलमध्ये तर रात्री बारा ते एकपर्यंत पार्ट्या रंगलेल्या दिसत आहेत. अशा परिस्थितीत कसा कोरोनाचा प्रादुर्भाव थांबणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-------------------
रस्त्याच्या कडेलाच भरते मधुशाळा
नगर शहरातील बोल्हेगाव, भिंगार, रेल्वे स्टेशन परिसर, कायनेटिक चौक, एमआयडीसी परिसर, नेप्ती परिसर, तपोवन रोड आदी ठिकाणी भरदिवसा अैवध दारू विकली जात आहे. विशेष म्हणजे, सायंकाळनंतर तळीरामांची बहुतांशी ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच मधुशाळा भरलेली दिसते. या तळीरामांचा परिसरातील रहिवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
---------------------
कोरोना संदर्भात लागू असलेल्या नियमांची नगर शहरात कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस ठाणे प्रभारींना दिल्या आहेत. सायंकाळी चारनंतर शहरात हॉटेलचालक अथवा इतर व्यावसायिक अशा कुणीही नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे.
- विशाल ढुमे, पोलीस उपअधीक्षक, नगर शहर
----------------------
कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करून दारू विक्री करणाऱ्या हॉटेल चालकांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. काही जणांचे परवानेही रद्द करण्यात आलेले आहेत. संपूर्ण जिल्हाभरात नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
मागील काही दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आणखी कडक कारवाई केली जाणार आहे.
- गणेश पाटील, अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग