पुन्हा महाविकास आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:54+5:302021-07-12T04:14:54+5:30
सहकारमहर्षी, थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १६ व्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि. ११) संगमनेर तालुक्यातील ...

पुन्हा महाविकास आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नका
सहकारमहर्षी, थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १६ व्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि. ११) संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथून करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर आघाडी सरकार धाराशाई होईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर महसूलमंत्री थोरात यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी टीका करण्यापेक्षा केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसत आहेत. त्यांचा विचार त्यांनी करावा. त्यांचे केंद्रात चांगले वजन आहे. त्यांनी ते इंधनाचे दर कमी करण्यासाठी वापरावे, असा टोलाही थोरात यांनी लगावला.
----------------
ही काळाची गरज आहे
पश्चिमेकडे खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. सह्याद्रीच्या पूर्वेकडील आपला भाग तुटीचे खोरे झाले आहेत. धरणे भरत नाहीत, कायम पाण्याचा तुटवडा येतो. ही टंचाई दूर करायची असेल तर पश्चिमेकडील समुद्रात जाणारे पाणी पूर्वेला घेणे ही काळाची गरज आहे. झालेली धरणे भरतील कशी? याकरिता काम करावे लागणार आहे, असेही महसूलमंत्री थोरात म्हणाले.
------------------
शक्य होईल तितक्या निवडणुका एकत्रित करणार
महाविकास आघाडीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. तिघांनाही पक्ष वाढवण्याची गरज आहे. प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करत असतो, त्यात चुकीचे काही नाही. स्वबळाचा नारा शिवसेनेने दिला, असे कुठेही मला दिसत नाही. शक्य होईल तितक्या निवडणुका एकत्रित करणार आहोत, असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.