कोविड फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST2021-07-17T04:17:57+5:302021-07-17T04:17:57+5:30
श्रीरामपूर : कोविडमुळे गेल्या वर्षापासून बंद झालेल्या पॅसेंजर रेल्वे अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे कोविड केवळ पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो ...

कोविड फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?
श्रीरामपूर : कोविडमुळे गेल्या वर्षापासून बंद झालेल्या पॅसेंजर रेल्वे अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे कोविड केवळ पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का? असा प्रश्न प्रवासी व्यक्त करत आहेत.
नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या दौंड-मनमाड या रेल्वेमार्गावर काही महत्त्वाच्या पॅसेंजर धावत होत्या. यामध्ये नांदेड-मनमाड-दौंड, नांदेड-निजामाबाद-मनमाड-पुणे व दौंड-मनमाड पॅसेंजर यांचा समावेश आहे. पुणे व नगर जिल्ह्याला मराठवाड्याशी जोडणाऱ्या आहेत. मात्र वर्षभरापासून रेल्वे प्रशासनाने त्यांना हिरवा कंदील दाखविलेला नाही.
पँसेंजर सर्वसामान्य जनतेला अत्यल्प दरामध्ये इच्छित स्थळी घेऊन जाते. ऐन वेळी काही कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांना त्याचा लाभ होतो. कारण एक्सप्रेसप्रमाणे पॅसेंजरला आरक्षणाची गरज भासत नाही. स्थानकावर जाऊन तिकीट खरेदी केल्यानंतर तत्काळ प्रवेश मिळतो.
नगर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, शिर्डी, पुणतांबा या जिल्ह्यातील स्थानकांवरून पॅसेंजरने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण यांच्यासाठी त्या मोठा आधार आहेत. पुणे येथे स्पर्धा परीक्षांकरिता विद्यार्थी महिन्यातून अनेकदा प्रवास करतात. एक्सप्रेसचा खर्च त्यांना परवडत नाही. आता पॅसेंजरही बंद झाल्याने त्यांचे हाल होत आहेत.
----------
सध्या सुरू असलेल्या एक्सप्रेस
गोवा एक्सप्रेस
झेलम एक्सप्रेस
हावडा एक्सप्रेस
कर्नाटक एक्सप्रेस
---------
मग पॅसेंजर बंद का?
सर्व एक्सप्रेस सुरू असताना पॅसेंजर बंद का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. एक्सप्रेसमधून कोविडचा फैलाव होत नाही. तो केवळ पॅसेंजरमधूनच फैलावतो असाच अर्थ काढायचा का? अशी प्रवाशांमध्ये चर्चा आहे.
--------
दानवेंचा लाभ होणार का?
मराठवाड्यातील प्रमुख नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्रीपद आले आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या निजामाबाद पॅसेंजरला ते हिरवा कंदील दाखवतील, अशी अपेक्षा आहे.
--------
पॅसेंजर बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील सारोळा, राहुरी, वांबोरी, टाकळीमिया, पढेगाव यासारखी रेल्वे स्थानके कायमची बंद होतील, अशी भीती आहे. सरकारचे धोरण अनाकलनीय आहे.
बन्सी फेरवाणी, सदस्य, रेल्वे स्थानक सल्लागार समिती, श्रीरामपूर.
------