येळपणेच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवेत रमले डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:20+5:302021-06-04T04:17:20+5:30
श्रीगोंदा : चिंभळे (ता. श्रीगोंदा) येथील डॉ. चेतन साळवे हे आडबाजूला असलेल्या येळपणे गावातील खंडेश्वर कोविड सेंटरमध्ये सेवाभावी वृत्तीने ...

येळपणेच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवेत रमले डॉक्टर
श्रीगोंदा : चिंभळे (ता. श्रीगोंदा) येथील डॉ. चेतन साळवे हे आडबाजूला असलेल्या येळपणे गावातील खंडेश्वर कोविड सेंटरमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. या अवलियाने १७ दिवसांत ५५ रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. सध्या ११ रुग्णांवर उपचार करीत आहेत.
युवा मित्र सतीश धावडे यांनी परिसरातील दहा गावांतील कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी स्व. सदाशिव पाचपुते यांच्या स्मरणार्थ येळपणे येथील विद्यालयात श्री खंडेश्वर कोविड सेंटर सुरू केले. त्यानंतर कोविड सेंटरमध्ये डाॅक्टरांचा प्रश्न पुढे आला. त्यावर चिंभळे येथील डॉ. चेतन साळवे यांनी रुग्णांवरील उपचाराची जबाबदारी खांद्यावर घेतली.
त्यांना बेलवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. कातकाडे यांनी मदत केली. १७ दिवसांत ५५ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. यामध्ये ८५ वर्षीय दादा नाथा पवार व एक वर्षीय बालक शिवराज डफळ यांनी कोरोनावर मात केली. यामध्ये डॉ. चेतन साळवे यांचे उपचार महत्त्वाचे ठरले आहेत. अनिल खामकर यांनी मोफत औषधे पुरवठा केला आहे.
येथे रुग्णांना इतर सुविधा देण्यासाठी रवी गावडे, जालिंदर धावडे, गणेश डफळ, नीलेश चौधरी, प्रवीण सांगळे, पप्पू थोरात यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे रुग्णांना आधार मिळाला आहे.
खंडेश्वर विद्यालयाचे जे. डी. पवार, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांनी लाख मोलाची मदत केली.
---
येळपणेत सुरू झालेल्या कोविड सेंटरमध्ये मोफत उपचार करण्याचे भाग्य लाभले. यापुढेही अडचणीच्या गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा धर्म पाळणार आहे.
- डॉ. चेतन साळवे,
चिंभळे
----
०३ चेतन साळवे, ०३ योगेश कातकडे